योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Temperature Today : महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होत असून अकोला शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी 42 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वाढून 42.1 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. मागील तीन दिवसात तापमानात चार अंशांनी वाढ झाल्याने अकोल्यात उकाडा वाढला आहे. गुरुवारी 38.7 अंशावर तापमान पोहोचलं होतं. पण शुक्रवारी या तापमानात वाढ होऊन ते 40.1 अंशांवर पोहोचलं. तर शनिवारी 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.अमरावती येथे 41.2 अंश तापमानासह दुसऱ्या क्रमांकाची नोंद झाली आहे.किमान तापमानातही काहीशी घट झाली असून ते 21.5 अंशांवर आले आहे.
नागरिक त्रस्त, प्रशासनाचे आवाहन
दुसरीकडे,तीव्र उन्हामुळे अकोल्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम दिसून येत आहे.दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून नागरिक शक्यतो घरातच राहणे पसंत करत आहेत.सकाळी 11 नंतर शहरात शांतता पसरलेली दिसते. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक रसवंतीगृहांकडे वळताना दिसत आहेत.
नक्की वाचा >> Asha Bhosle Death : पुण्यात होतं आशा भोसलेंचं फेव्हरेट हॉटेल, 1997 पासून सहकुटुंब खायच्या मटणाची थाळी
ऊस आणि मोसंबीच्या रसाला मोठी मागणी वाढली आहे. तसेच टरबूज आणि खरबूज यांसारख्या रसाळ फळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. आरोग्य प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळावे,भरपूर पाणी प्यावे,शिळे व उघडे अन्न खाऊ नये,तसेच छत्री,गॉगल आणि दुपट्ट्याचा वापर करावा,असे आवाहन केले आहे.
राज्यात उष्णतेची लाट कायम
हवामान अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश चोपने यांच्या मते,राजस्थानमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.जाणवणारी उष्णता ही प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक भासणार आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: केडीएमसीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा बारमधील धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल, कल्याणमध्ये खळबळ
चक्कर येणे,उलट्या होणे,डोकेदुखी आणि अंगात ताप येणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत.अशी लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत न्यावे.शरीर थंड ठेवावे आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी दुपारी १२ ते ५ या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.