महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रात्रीच्या गुप्त भेटींनी राजकारण तापू लागलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बुधवारी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटींमुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचा अंदाज आहे.
पार्थ पवारांच्या वाढत्या वर्चस्वामुळे ज्येष्ठ नेते नाराज?
अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षात पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप आणि त्यांची कार्यपद्धती यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे ज्येष्ठ नेते अत्यंत नाराज आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात आपले स्थान दुय्यम झाल्याची भावना या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात "सुधारणात्मक पावले" उचलण्याची गरज असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवल्याने हा वाद अधिकच वाढला. राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी तर थेट सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही निवड 'बेकायदेशीर' असल्याचे म्हटले आहे.
(नक्की वाचा- LPG Cylinder: बुकिंगची कटकट संपणार, अवघ्या काही मिनिटात सिलेंडर मिळणार घरपोच; कुठे मिळेल ही सुविधा?)
सुनेत्रा पवारांनी मागवले स्पष्टीकरण; तटकरेंकडून सारवासारव
या गुप्त भेटींची कोणतीही पूर्वकल्पना सुनेत्रा पवार यांना नसल्याने पक्षात खळबळ उडाली. सूत्रांनुसार, सुनेत्रा पवार यांनी या भेटीबाबत सुनील तटकरे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यावर तटकरे यांनी ही भेट राजकीय नसून प्रशासकीय कामासाठी होती, असे सांगत सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवण्याचा कोणताही हेतू नव्हता, अशी सारवासारव केली आहे.
जयंत पाटीलही मुख्यमंत्र्यांच्या दरबारी! विलीनीकरणाची चर्चा?
या संपूर्ण राजकीय नाट्यात आणखी एक मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हेदेखील त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले. एकाच वेळी दोन्ही विरोधी गटांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
पक्षांचे विलीनीकरण करण्याच्या चर्चा अजित पवार जिवंत असताना सुरू होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर हा विषय थंड बस्त्यात पडला आहे. आमची भेट निव्वळ योगायोग होती, असं दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. तर राजकीय तज्ज्ञांच्या मते, दोन विरोधी गटांतील तीन मोठे नेते एकाच वेळी रात्रीच्या वेळी मुख्यमंत्र्यांना भेटणे हा केवळ योगायोग असू शकत नाही. पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठे शिजत आहे.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवार गटातील काही आमदारांना सोबत घेऊन एनडीएमध्ये सामील होण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दावा फेटाळून लावत, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया (INDIA) आघाडीसोबतच आहोत, असे स्पष्ट केले आहे.