Nashik News: नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यानंतर गेल्या 30 दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण 14 भोंदू बाबांना बेड्या ठोकल्या आहेत. या बाबांनी 'दैवी शक्ती' आणि 'चमत्काराच्या' नावाखाली शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नाशिकच्या अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले असून, एसआयटी (SIT) कडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली आहे. खरातच्या अटकेनंतर राज्यात एकामागून एक भोंदू बाबांच्या अटकेचे सत्र सुरू झाले.
कोणत्या 'बाबां'वर कारवाई झाली?
- अशोक कुमार खरात, नाशिक
- गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर
- चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला )
- पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे )
- मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर )
- नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे )
- ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई )
- अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई)
- रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई )
- गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर )
- अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई
- विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
- किसन तळपे मंदोशी, खेड
- महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक
'अंनिस'चे पीडितांना आवाहन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. "भिती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, अशा भोंदूंचा मुळासकट नायनाट करण्यासाठी महिलांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.