- महाराष्ट्र पोलीस दलाने गणवेशात रील, मिनी-व्लॉग किंवा व्हिडिओ पोस्ट करण्यास पूर्ण मनाई केली आहे
- मुंबईतील ५१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असून उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होईल
- काही पोलीस कर्मचाऱ्यांनी संवेदनशील ठिकाणे आणि शस्त्रे चित्रीत केल्यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण झाला
महाराष्ट्र पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात रील, मिनी-व्लॉग किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील 51,000 पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगविषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वेळा पोलीस आपल्या वर्दीमध्ये रिल करताना दिसत होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्याला लागला आहे.
विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले की, अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने आणि शस्त्रे यांचे चित्रीकरण करतात. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.
या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 'खाकी स्वॅग' सारख्या ट्रेंडवर आता पूर्णपणे बंदी येणार असून, खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'खाकी स्वॅग' नावाचा ट्रेंड पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला होता. मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता भंग पावत असल्याची तक्रार होती.
पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठीच करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभेतही लोकप्रतिनिधींनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनतर आता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्याच्याकडून याचे उल्लंघन होईल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता अशा व्हिडीओना चाप बसण्यास मदत होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world