जाहिरात

Power Crisis: राज्यावर वीजटंचाईचं संकट! महानिर्मितीचे 6 वीज संच ठप्प; पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे

महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच राज्यावर गंभीर वीजसंकटाचे सावट निर्माण झाले आहे. महानिर्मितीचे 6 औष्णिक वीज निर्मिती संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने वीज पुरवठ्यात सुमारे 1500 ते 1700 मेगावॉटची प्रचंड घट झाली आहे.

Power Crisis: राज्यावर वीजटंचाईचं संकट! महानिर्मितीचे 6 वीज संच ठप्प; पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे

महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असतानाच, आता संपूर्ण राज्यावर वीज पुरवठ्याचे मोठे संकट ओढवले आहे. महानिर्मितीचे तब्बल 6 औष्णिक वीज निर्मिती संच तांत्रिक कारणांमुळे एकाच वेळी बंद पडले आहेत. यामुळे राज्याला मिळणाऱ्या एकूण विजेमध्ये 1500 ते 1700 मेगावॉटची प्रचंड घट झाली असून महावितरणची डोकेदुखी वाढली आहे.

तांत्रिक बिघाड आणि वाढत्या तापमानाचा फटका

विदर्भातील महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि खापरखेडा येथील वीज निर्मिती संचांमध्ये एकापाठोपाठ एक तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहेत. कोळशाच्या उपलब्धतेचा प्रश्न आणि सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे यंत्रसामग्रीवर आलेला प्रचंड ताण, यामुळे हे 6 संच ठप्प झाले असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मे महिन्याच्या शेवटी राज्यातील विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असतानाच हा बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यासमोर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

मागणी 28000 मेगावॉटच्या पार

यावर्षी उन्हाळा प्रचंड तापमानामुळे गाजत असून महाराष्ट्र राज्यातील विजेची मागणी 28 हजार मेगावॉटच्या देखील पुढे गेली आहे. एकीकडे महानिर्मितीचे संच बंद पडले आहेत, तर दुसरीकडे खुल्या बाजारातूनही पुरेशा प्रमाणात वीज खरेदीसाठी उपलब्ध होत नाहीये. परिणामी, विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून, ही तफावत भरून काढण्यासाठी महावितरणला नाईलाजाने काही भागांत वीज कपात करावी लागत आहे.

नागपूरकरांना उन्हाचा चटका आणि विजेचा फटका

उपराजधानी नागपुरात सध्या तापमान 46 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. अशा रणरणत्या उन्हात शहरातील काही उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागात घोषित-अघोषित भारनियमन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. दुपारच्या कडक उन्हात आणि रात्रीच्या वेळीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे

महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद पडलेले संच पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील 24 ते 48 तासांत हे संच पुन्हा सुरू होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी घरात आणि कार्यालयात विजेचा वापर अत्यंत जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहन वीज कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com