यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : अमेरिका-इस्त्रायल-इराणमधील युद्ध अद्यापही थांबलेलं नाही. या युद्धाचा परिणाम जगभरातील देशांवर घोंगावत आहे. दरम्यान जगातील अनेक देशांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दिनचर्या कोलमडली आहे. भारतात तर व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. पुण्यात तर कित्येक खाणावळी बंद झाल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. या धगामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी गावची वाट धरली आहे.
दरम्यान पुण्यात सर्वात मोठ्या येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या मनोरुग्णालयातील सिलिंडरचा साठा संपला आहे. सुमारे १२०० मनोरुग्णांना नाश्ता आणि जेवण देणं अशक्य होत आहे. नाश्ता आणि जेवण वेळेवर न दिल्यास मनोरुग्णांची मानसिक स्थिती बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. उपाशी राहिल्यामुळे अतिउत्साही होऊन मनोरुग्ण हिंसक हल्ला करण्याची शक्यता आहे. मनोरुग्णालयाच्या अधिक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्यात आलं आहे. मनोरुग्णांच्या वागणुकीत बदल होत असल्यामुळे तातडीने पावले उचलण्याची विनंती केली जात आहे.
दोन दिवसांचा साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ
राज्यातील विविध जिल्ह्यातील मनोरुग्णांना औषधोपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात 12 ते 14 गॅस सिलिंडर लागतात. मात्र येथील संपूर्ण साठा संपला आहे. केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक असल्यामुळे तब्बल बाराशे मनोरुग्णांना नाश्ता आणि जेवण पुरवणे अशक्य झाले आहे. परिणामी वेळेवर नाश्ता आणि जेवण न मिळाल्यास मनोरुग्णांची मानसिक स्थिती बिघडून अघटित घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर श्रीनिवास कोलोड यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना लिहिलेल्या लेखी पत्रात मनोरुग्णांच्या वागणुकीत बदल होत असल्याची भीती व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world