जागतिक हवामान बदलाचा फटका भाजीपाला पिकांना बसू लागला आहे. यंदा उन्हाचा पारा चाळिशीच्या पार असल्याने टोमॅटोच्या उत्पादनास त्याचा फटका बसला आहे. उन्हाळी हंगामातील या फळभाजीचे उत्पादन घटल्याने सध्या टोमॅटो भडकला असून किरकोळ बाजारातील भाव किलोला शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. याला कारण लिफ करोल व्हायरस आहे. हा व्हायरस इतका भयानक आहे की, तो टोमॅटोच्या पिकात शिरला हे लवकर समजत नाही. अचानक टोमॅटोचं पीक नष्ट होते. तेव्हाच शेतकऱ्यांना आपल्या पिकाला या भयानक व्हायरसची लागण झाल्याचं समजते.
जागतिक हवामान बदलाचे आव्हान सध्या शेतीसमोर निर्माण झाले आहे. कधी तप्त उन्हाचा तडाखा आणि मधेच मुसळधार पावसाचा फटका तर कधी गारपिटीची आपत्ती यामुळे शेती व्यवसायाचे सगळे गणितच सध्या बिघडले आहे. याचा परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर होत यंदा मोठी घट झाली आहे.
दर का वाढले?
टोमॅटोचे पीक 90-100 दिवसांचे असते. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागवडीवर याचा परिणाम झाला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्याची उपलब्धता कमी राहिली. मे महिन्यात अवकाळी पावसाची साथ पिकाला मिळाली. पण जून महिन्यात पावसाने दडी मारली. तर दुसरीकडे तापमान मात्र चढेच राहिले.
नक्की वाचा - मोबाईलवर स्पीकर ऑन करुन बोलत असाल तर ही बातमी नक्की वाचा
लिफ करोल व्हायरस दक्षिणेतून भारतात आला आहे. त्याचा फटका आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही बसला असून पांढऱ्या माशीमुळे हा व्हायरस अख्ख्या टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त करतोय. यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पांढरी माशीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. या व्हायरसवर सध्या तरी कोणतंही औषध उपलब्ध नसून केवळ खबरदरी घेणे हाच एक उपाय आहे. टोमॅटोच्या शेतीमध्ये साधारण एक दिवसाआड 25 किलो वजनाचे 200 ते 250 कॅरेट इतके उत्पादन मिळते. एकूण 800 ते एक हजार कॅरेट उत्पादन मिळते. यंदा बिघडलेल्या हवामानामुळे रोजचे उत्पादन 125 ते 150 कॅरेटवर आले आहे. याचा परिणाम बाजारात टोमॅटोची आवक कमी होण्यावर झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world