
सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar: जुन्या वादातून तरुणाचा त्याच्या दोन मुलांसमोरच हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वेस्थानक उड्डाण पुलाखाली ही थरारक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाची त्याच्या दोन लहान मुलांसमोरच हा सगळा प्रकार घडला. सय्यद इम्रान सय्यद शफिक असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली. गॅस व्यवसायाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांनी इम्रानची बोटे आणि उजव्या हाताचे मनगट छाटून त्याला ठार मारले. या घटनेने संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली. साताऱ्याच्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना केवळ 9 तासांत अटक केली.
(नक्की वाचा- Ulhasnagar Crime: 'मी इथला भाई..',गरब्यात केला गोळीबार,शिवसेना नेत्यावरही बंदूक ताणली..पण पोलिसांनी जे केलं..)
घटना कशी घडली?
इम्रान सय्यद शफिक हा त्याचे 13 वर्षांचा मुलगा अयान (Ayaan) आणि 3 वर्षांचा मुलगा अजान (Aazaan) यांच्यासोबत रिक्षातून घरी परतत होता. सिल्क मिल कॉलनी परिसरात उड्डाण पुलाखाली त्यांची रिक्षा सुसाट वेगाने आलेल्या कारने अडवली.
कारमधून पाच ते सहा जण खाली उतरले. त्यांनी इम्रानच्या दोन्ही मुलांना रिक्षातून बाहेर काढले आणि इम्रानवर शस्त्रांनी हल्ला चढवला. इम्रानने हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्याची बोटे कापली आणि उजव्या हाताचे मनगटही छाटले. या क्रूर हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि मानेवर शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केली. या घटनेमुळे दोन्ही मुलांवर मानसिक आघात झाला आहे.
(नक्की वाचा - 'मला रडू कोसळलं..घरात सुखाचा घास सुद्धा तोंडात गेला नाही', पंकजा मुंडेंनी भगवानगडावर सांगितला 'तो' किस्सा)
9 तासांत 'मुजीब डॉन' सह तिघांना अटक
या गँगवॉरमध्ये हत्या झाल्यानंतर साताऱ्याच्या पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि अवघ्या 9 तासांत आरोपींना अटक केली. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी मुजीब डॉन याच्यासह त्याचा सख्खा तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ सद्दाम हुसैन मोईनुद्दीन आणि आतेभाऊ शेख इरफान शेख सुलेमान या तिघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित मुजीब डॉन याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुलांसमोरच वडिलांची एवढ्या क्रूरपणे हत्या झाल्यामुळे संभाजीनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गँगवॉर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world