भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी सह्याद्री हॉस्पिटल्स विकत घेतली आहे. हा मोठा व्यवहार अंदाजे 6,400 कोटी रुपयांना झाला असून, कॅनडाच्या ऑन्टारियो टीचर्स पेन्शन प्लॅन कडून ही खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीमुळे मणिपालच्या नेटवर्कमध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कराड येथील 11 सह्याद्री रुग्णालये सामील झाली आहेत. यामुळे आता मणिपालकडे देशभरात 49 रुग्णालये आणि सुमारे 12,000 खाटा उपलब्ध असतील, ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा नेटवर्कपैकी एक बनले आहे.
(नक्की वाचा: पुणेकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांंच्या पाणीसाठी मोठी वाढ)
चारुदत्त आपटेंनी केली सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना
1994 मध्ये डॉ. चारुदत्त आपटे यांनी स्थापन केलेली सह्याद्री हॉस्पिटल्स ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी खासगी रुग्णालय साखळी आहे. यात 1,200 ते 1,400 खाटा, 2,500 डॉक्टर आणि 3,500 कर्मचारी आहेत. ही रुग्णालये न्युरोलॉजी, हृदयरोग, कर्करोग, हाडांचे आजार, प्रत्यारोपण आणि माता-बाल संगोपन यांसारख्या सेवांसाठी प्रसिद्ध आहेत. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या मालकीचा इतिहास पाहिला तर 2019 मध्ये एव्हरस्टोन कॅपिटलने सह्याद्री विकत घेतली होती. त्यानंतर 2022 मध्ये ऑन्टारियो टीचर्स पेन्शन प्लॅनने ती 2,500 कोटी रुपयांना घेतली. आता मणिपालने ती आपल्या ताब्यात घेतली आहे.
(नक्की वाचा: नोकरीची मोठी संधी, पुण्यात 2 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी रोजगार मेळावा)
आरोग्य सेवा क्षेत्रातील या वर्षातील सर्वात मोठा सौदा
हा सौदा जिंकताना मणिपालने फोर्टिस, अॅस्टर डीएम आणि इतर मोठ्या कंपन्यांना मागे टाकले. विशेष म्हणजे हा 2025 मधील भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. मणिपालचे अध्यक्ष डॉ. रंजन पै यांनी या अधिग्रहणाबाबत म्हटले आहे की, "या खरेदीमुळे आम्ही पश्चिम भारतात अधिक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊ शकू." तर सह्याद्रीचे सीईओ अब्रारअली दलाल यांनी सांगितले की, "2022 पासून 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आम्ही रुग्णालयांचा विस्तार केला."