Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मोर्चासाठी केवळ एका दिवसाची परवानगी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सध्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा तरुणांच्या वेदना फडणवीस यांनी समजून घ्याव्या, असे आवाहन करत त्यांनी सरकारवर जाणूनबुजून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
जरांगे पाटील म्हणाले की, "या भरपावसात तरुण मोटारसायकलवरून प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, हा काही हट्ट नाही, तर मराठा समाजाच्या वेदना आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या वेदनांची कदर केली पाहिजे." ते पुढे म्हणाले की, "मला आशा आहे की देवेंद्र फडणवीस कुणालाही थांबवणार नाहीत आणि गोरगरीब मराठा लेकरांच्या वेदनांचा सन्मान करतील."
(नक्की वाचा- Maratha Reservation: 'इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही', भाजप नेत्यांचं जरांगेंना प्रत्युत्तर)
मुंबईतील आंदोलनासाठी फक्त एका दिवसाची परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे पाटील म्हणाले, "सरकारला न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे करावे लागले हे अंतिम सत्य आहे. मात्र आंदोलनाला परवानगी देणे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात होते, हे देखील समोर आलं आहे. त्यामुळे फक्त एक दिवसाची परवानगी देणे ही गरीब मराठा समाजाची चेष्टा आहे. 'मी परवानगी दिली, माझी काय चूक?' हे फडणवीसांना सिद्ध करायचे होते, पण यामुळे राज्यात काय संदेश गेला, तो सर्वांना कळला आहे."
जाणूनबुजून परवानगी नाकारल्याचा आरोप
जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, "न्यायालयाने सांगितले असले तरी, परवानग्या देण्याचा अधिकार तुमच्याकडेच होता. पण तुम्ही जाणूनबुजून समाजाला फक्त एका दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे समाजात मोठी नाराजीची लाट उसळली आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या वेदना खूप आहेत. तुम्ही आम्हाला आंदोलनासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. त्यानंतरच आम्ही तुमचे कौतुक करू."
(नक्की वाचा- Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?)
फडणवीसांंनी मराठा विरोधी आडमुठेपणाची भूमिका सोडा
जरांगे पाटील यांनी म्हटलं की, "देवेंद्र फडणवीस साहेबांनी गैरसमज दूर करावा. तुमची बहुमताची सत्ता मराठा समाजाशिवाय आलेली नाही. जर मराठ्यांची नाराजीची लाट आली, तर ती राजकीय करिअर बर्बाद करणारी असू शकते.' पुढे जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना नम्र विनंती केली की, "ही मराठा समाजाची मने जिंकण्याची तुमच्यासाठी एक सोन्याची संधी आहे. तुम्ही आरक्षण दिली तर आम्ही आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. तुम्ही आमचे शत्रू नाही, त्यामुळे तुम्ही मराठा विरोधी आणि आडमुठेपणाची भूमिका सोडा. मराठ्यांची मने जिंका, मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही."
'गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही'
सरकार मराठा समाजाची चेष्टा करत असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. "मराठा समाजाला मूर्ख बनवतात, माझा आणि समाजाचा अपमान करतात. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे जरांगेंनी ठामपणे सांगितले. "आता गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आंदोलन आणि सरकार यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.