
Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनोज जरांगे सातत्याने निशाणा साधत आहेत. मनोज जरांगे यांच्या टीकेला आता भाजपच्या नेत्यांनी पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले आहे. या नेत्यांनी एका जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचे आणि ते न्यायालयात टिकवण्याचे संपूर्ण श्रेय फडणवीस यांना दिले आहे. "इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो," अशा शब्दांत फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?)
भाजप नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर लिहिलं आहे की, 'इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, तर इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस...' प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील यांनी नावे या पोस्टरवर आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेच मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते. या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. अशा परिस्थितीतही हे आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारने यशस्वी प्रयत्न केले, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होता, पण त्यात यश आले नव्हते. मात्र, फडणवीस यांच्या काळात हा प्रश्न मार्गी लागला, असे त्यांचे समर्थक मानतात.
(नक्की वाचा : Maratha Morcha traffic change: पुणेकरांनो लक्ष द्या! मराठा मोर्चासाठी वाहतुकीत मोठा बदल, हे आहेत पर्यायी मार्ग)
या प्रसिद्धीपत्रकामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना, भाजपने मराठा आरक्षणाचे श्रेय फडणवीस यांना देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world