उपोषणाचा विरोध उपोषणाने, अंतरवालीत जरांगे विरूद्ध हाके आमनेसामने येण्याची शक्यता

जरांगे यांनी उपोषणाचा इशारा देताच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. जरांगे निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे हाके यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. 16 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते उपोषण करणार आहेत. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथे या दिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहेत. याच्या एक दिवस आधी मनोज जरांगे हे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री ध्वजारोहणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असताना त्यापूर्वी जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केल्याने, हा मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

(नक्की वाचा -  शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ, MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मनोज जरांगेंनी उपोषणाची हाक दिल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. मराठवाड्यात हैदराबाद संस्थानाचे गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण कसे मिळू शकते याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीचा तपशील आपण मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले आहे. भुमरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काही घोषणा करतात का याकडेही मराठा समाजाचे लक्ष लागलेले असेल.

लक्ष्मण हाके यांचा इशारा

जरांगे यांनी उपोषणाचा इशारा देताच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. जरांगे निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे हाके यांचे म्हणणे आहे. हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केला आहे.  

(नक्की वाचा -  काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण)

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी म्हटले होते की, जरांगे जिथे आंदोलन करतील तिथे जाऊन आपणही लक्ष्मण हाके यांच्यासोबत उपोषण करू. जरांगे अंतरवालीत उपोषण करणार असतील तर तिथेही जाऊन उपोषण करू, असे वाघमारे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आणि हाके आमनेसामने येण्याची शक्यता असून इथे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वाघमारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्षच जरांगे यांना रसद पुरवत असल्याचाही आरोप केला आहे.