गेल्या 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत ड्रोनच्या घिरट्या; जरांगेंची कोण करतंय टेहाळणी?

गेल्या चार दिवसांपासून ही टेहाळणी कोण करतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाची आणि अंतरवाली सराटी या गावातील सरपंचांच्या घराची ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या चार दिवसांपासून ही टेहाळणी कोण करतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षाच्या 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू केलंय. याच आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या गावातून सुरू झालेलं हे आंदोलन राज्यभरात पसरलं. त्यानंतर जरांगे यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. राज्यभर दौरे करत मराठा समाजाची एकजूट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समाजाच्या विरुद्ध जाणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पाडा अशी भूमिका घेतली. याचा परिणाम महाराष्ट्रासह मराठावड्यात पाहायला मिळाला.

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी गावातून आंदोलनाची हाक दिली. सरकारच्या शिष्ट मंडळाने जरांगे यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली होती. सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी  करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर जरांगे पाटील यांनी 13 जुलैपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत मराठ्यांच्या महाशांती रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेत अंतरवाली सराटी गावात मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असतानाचं जरांगे पाटील यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

नक्की वाचा - नव्या कायद्यांनुसार अमरावतीत पहिला गुन्हा दाखल, शेतीच्या पेरणीवरून उफाळला वाद

जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावातील आंदोलन स्थळ आणि जरांगे पाटील राहत असलेल्या मळ्यातील घरावर रात्री-अपरात्री चार ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख आणि गावकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात फोनवरून गोंदी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. गेल्या चार दिवसापासून जरांगे पाटील यांच्या हालचालीवर ड्रोनच्या माध्यमातून कोण करडी नजर ठेवतंय? पाळत का ठेवली जात आहे? यासंदर्भात सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिकांकडून राज्य सरकार विरुद्ध संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करत सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांनी मात्र अशा प्रकाराला मी घाबरत नसल्याच म्हणत मी अखेरपर्यंत समाजासाठी लढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. अद्याप कोणाकडून टेहाळणी केली जात आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. तरी तपासाअंती सत्य समोर येईल. 

Advertisement