भारतीय न्याय संहितेची (Indian Judicial Code) 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाली असून या नव्या कायद्यांन्वये अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या पेरणीच्या वादातून दोन नातेवाईक कुटुंबांमध्ये अंजनवती परिसरातील मसदी शेतशिवारात हाणामारी करत कुऱ्हाडीने हल्ला केल्याच्या प्रकरण हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
1 जुलै रोजी 5.30 वाजताची ही घटना असून या प्रकरणात कुऱ्हा पोलीस ठाण्यात रात्री 9.30 वाजे दरम्यान पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विरूद्ध पक्षानेही तक्रार दिल्याने पोलिसांनी परस्परांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अमरावतीच्या कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंजनवती परिसरातूस मसदी क्षेत्रात आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता शेतीच्या पेरणीचा वाद उद्भवला. हा वाद विकोपाला गेल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कुऱ्हाडीनेही हल्ला करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादी प्रविण बाबुराव पुणसे यांच्या तक्रारीवरून दोन महिलांसह चौघांविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 351, 352, 324 (4), 3 (5) अन्वये कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात आरोपी असलेल्या विरूद पक्षानेही हाणामारीची तक्रार दिल्याने कुऱ्हा पोलिसांनी 2 महिलांसह चौघांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
नक्की वाचा - New Criminal Laws: देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू, जाणून घ्या प्रत्येक मुद्दा
1 जुलैपासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू..
देशभरात 1 जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world