Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मराठी व्यक्तीला मारहाण; महाराष्ट्र एकीकरण समितीचा गंभीर इशारा

Mira-Bhayandar News : मराठी एकीकरण समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. "

जाहिरात
Read Time: 2 mins

मीरा-भाईंदर येथील राई गावात पाच ते सहा परप्रांतीय व्यक्तींनी एका मराठी व्यक्तीला जीवघेणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, मराठी एकीकरण समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत, अटक न झाल्यास पुन्हा एकदा शहरात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला आहे. या घटनेमुळे मराठी व्यक्ती रक्तबंबाळ झाल्याचे समोर आले आहे. परप्रांतीयांची दादागिरी आता वाढत असून, त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही, असा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.

'मराठी अस्मितेवर हल्ला' झाल्याचा आरोप

मराठी एकीकरण समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. "मराठी माणसांनो, अजून किती सहन करणार?", असा सवाल त्यांनी केला आहे. राई गावात केवळ मराठी असल्याच्या कारणावरून आपल्या भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला. "आरोपी मोकाट आहेत आणि शासन गप्प आहे," असेही त्यांनी म्हटले आहे. समितीने या घटनेला केवळ एका व्यक्तीवरील हल्ला न मानता मराठी अस्मितेवर झालेला हल्ला मानले आहे.

(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)

भाजप नेत्यांवरही साधला निशाणा

मराठी एकीकरण समितीने या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. "फडणवीस साहेब, मोदी-शाह-लोढाच्या सतरंज्या उचलून झाल्या असतील तर आता आपल्या राज्यात डोकं वर काढलेल्या गुन्हेगारांकडे पाहा!" अशी खोचक टीका त्यांनी केली. हे उपरे इतके माजले आहेत की ते थेट जीव घेण्यावर उतरले आहेत, असेही समितीने म्हटले आहे.

(नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर)

या घटनेतील आरोपींवर मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही समितीने केली आहे. जर तात्काळ अटक झाली नाही, तर मीरा-भाईंदरमध्ये ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता तशाच पद्धतीचा मोर्चा पुन्हा काढण्यातील असा इशारा मराठी एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article