Mumbai Police: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यामुळे सध्या संपूर्ण देशात 'मेस्सीमय' वातावरण निर्माण झाले आहे. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली असा प्रवास करत मेस्सीने लाखो चाहत्यांना भेट दिली.
कोलकात्याच्या स्टेडियममध्ये मेस्सीची झलक पाहता न आल्यामुळे काही चाहत्यांनी संतापून मैदानात गोंधळ घालत तोडफोड केली होती. शांततामय मुंबई दौरा मात्र, त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा दौरा अत्यंत सुरक्षित आणि सुरळीत पार पडला. यात मुंबईतील कार्यक्रम खास ठरला.
मुंबई दौऱ्याची खास गोष्ट
मुंबई दौऱ्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि मेस्सी यांची भेट जगभर चर्चेचा विषय ठरली. मुंबई दौरा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांतपणे पार पडला, यात मुंबई पोलिसांचा मोठा वाटा आहे. चाहत्यांनी याची दखल घेत मुंबई पोलिसांचे खास आभार मानले. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे हजारो फॅन्स नरिमन पॉईंटवर जमले होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी पोलिसांने कौतुक केले.
चाहत्यांनी हटके स्टाईलमध्ये मानले आभार
नरिमन पॉईंटवर जमलेल्या हजारो फॅन्सनी मुंबई पोलिसांचे त्यांच्या हटके स्टाईलमध्ये आभार मानले. फॅन्सनी पोलिसांसाठी जोरजोरात टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. मेस्सीच्या हजारो फॅन्स एका सुरात "थँक यू, थँक यू..." असे ओरडताना दिसले. @pawaskarpratik या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)
पोलिसांच्या भावना
चाहत्यांच्या या कृतीने पोलीसही भारावले. दिवसभराच्या कष्टाचे चीज झाले, ही भावना पोलिसांच्या चेहऱ्यावरील हास्यातून स्पष्ट दिसत होती. शांतता आणि शिस्त राखल्याबद्दल मिळालेले हे कौतुक पोलिसांसाठी मोठा सन्मान होता.
इन्स्टाग्राम व्हिडीओवरील कमेंट्स
चाहत्यांनी कमेंट्स करूनही पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलं की, 'त्यांच्या चेहऱ्यावरील हसू सर्व काही सांगत आहे.' आणखी एकाने लिहिलं की, 'या कृतीने त्यांचा आणि प्रत्येकाचा दिवस बनवला. सर्व मुंबई पोलिसांना सॅल्युट.'