जाहिरात

MHADA Lottery: म्हाडाची 'फास्ट' लॉटरी! मुंबईत तुमच्या आवडीचं घर कसं बुक करायचं? वाचा A to Z नियम आणि पद्धत

MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

MHADA Lottery: म्हाडाची 'फास्ट' लॉटरी! मुंबईत तुमच्या आवडीचं घर कसं बुक करायचं? वाचा A to Z नियम आणि पद्धत
MHADA Mumbai Lottery 2026 : मुंबईत म्हाडाचं घर हवंय? 'या' पद्धतीनं करा अर्ज
मुंबई:

MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर 120 सदनिकांच्या विक्रीची घोषणा केली असून, यासाठी 5 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे.

ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि प्रक्रियेचे वेळापत्रक

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या विविध वसाहतींमधील या सदनिकांसाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. 

या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी [https://bookmyhome.mhada.gov.in](https://bookmyhome.mhada.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी. यापूर्वीच्या सोडतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

अर्ज नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष सदनिका निश्चित करण्याची प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सुरू होईल. यामध्ये ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे आणि आपली पसंतीची सदनिका निवडणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

 विशेष म्हणजे सदनिका निश्चित केल्यानंतर केवळ 48 तासांच्या आत एकूण विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे अर्जदारासाठी अनिवार्य असेल.

( नक्की वाचा : Mumbai-Pune : साडेतीन तासांचा प्रवास मिनिटांवर येणार; मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वेचा असा आहे प्लॅन )
 

 कोणत्या भागात किती सदनिका उपलब्ध आहेत?

या योजनेअंतर्गत मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 120 सदनिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मंडळाने स्वतः बांधलेल्या 84 सदनिकांचा समावेश असून त्याचे वितरण खालीलप्रमाणे आहे:

शिंपोली कांदिवली येथे 08 सदनिका, चारकोप सेक्टर-8 कांदिवली येथे 02 सदनिका, अँटॉप हिल-वडाळा येथे 27 सदनिका आणि तुंगा पवई येथे सर्वाधिक 44 सदनिका उपलब्ध आहेत. याशिवाय पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आणि गायकवाड नगर मालवणी येथे प्रत्येकी 01 सदनिका विक्रीसाठी आहे.

विकास नियंत्रण नियमावली 33(5) (7) अंतर्गत मंडळाला प्राप्त झालेल्या उर्वरित 36 सदनिकांची माहिती अशी आहे: घाटकोपर पूर्व 02, कन्नमवार नगर विक्रोळी 01, अँटॉप हिल-वडाळा 08, भायखळा 06, ताडदेव 06, लोअर परळ 04, सायन 02 आणि जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम येथे 07 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांना बुलेट ट्रेनचे डबल गिफ्ट! मुंबई आणि हैदराबादचा प्रवास सुसाट, वाचा तुमचं स्टेशन आणि माहिती )

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ती व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. कागदपत्रांच्या बाबतीत, अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, तर विवाहित असल्यास पती-पत्नी दोघांची ही कागदपत्रे लागतील. घटस्फोटीत अर्जदारांसाठी न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत आवश्यक असेल.

आरक्षण प्रवर्गातून अर्ज करणाऱ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असावा आणि पती-पत्नी दोघांचे स्वतंत्र ईमेल आयडी असणे अनिवार्य आहे.

सदनिका निश्चिती आणि पेमेंटची अट

अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला बुक माय होम हे बटन दिसेल, जिथे इमारत क्रमांक, विंग आणि मजल्याची माहिती उपलब्ध असेल. एखादी सदनिका उपलब्ध असेल, तर ती अर्जदार तात्काळ निवडू शकतात. एकदा अर्ज सादर केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भरावी.

सदनिका निश्चित झाल्यानंतर 48 तासांच्या आत 10 टक्के रक्कम भरावी लागेल. जर ही रक्कम वेळेत भरली नाही, तर सदनिकेवरील दावा रद्द होईल आणि भरलेली अनामत रक्कम म्हाडाकडून जप्त केली जाईल. 

उर्वरित रक्कम भरण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जाईल. जर गृहकर्ज घ्यायचे असेल, तर बँकेचे प्री-सँक्शन लेटर लॉगिन आयडीवरून अपलोड करणे आवश्यक आहे.

दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन

म्हाडाने स्पष्ट केले आहे की, या सदनिकांच्या विक्रीसाठी कोणत्याही एजंट किंवा सल्लागाराची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी पैशांचे व्यवहार करू नयेत. फसवणूक टाळण्यासाठी म्हाडाच्या हेल्पलाईन क्रमांक 9869988000 वर किंवा 022-66405448 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com