जाहिरात

Mumbai-Pune : साडेतीन तासांचा प्रवास मिनिटांवर येणार; मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वेचा असा आहे प्लॅन

Mumbai-Pune High-Speed Rail : मुंबई ते पुणे हा साडेतीन तासांचा प्रवास आता केवळ 45 ते 60 मिनिटांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे

Mumbai-Pune : साडेतीन तासांचा प्रवास मिनिटांवर येणार; मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वेचा असा आहे प्लॅन
Mumbai-Pune High-Speed Rail:  मुंबई ते पुणे अंतर आता विक्रमी वेळात पूर्ण होणार आहे.
मुंबई:

Mumbai-Pune High-Speed Rail:  मुंबई ते पुणे हा साडेतीन तासांचा प्रवास आता केवळ 45 ते 60 मिनिटांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वे क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदीमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासोबतच दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडण्यासाठी केंद्र सरकारने हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर लक्ष केंद्रित केले असून यामुळे दळणवळणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.

रेल्वे अर्थसंकल्पातील मोठी तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,78,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद जाहीर केली आहे. या निधीचा मुख्य वापर हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक आणि रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी केला जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी देशातील सात नवीन मार्गांवर हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली असून, यामध्ये मुंबई-पुणे मार्गाचा प्रामुख्याने समावेश आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे मुंबई ते पुणे हे अंतर एका तासापेक्षा कमी वेळात कापता येईल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांना बुलेट ट्रेनचे डबल गिफ्ट! मुंबई आणि हैदराबादचा प्रवास सुसाट, वाचा तुमचं स्टेशन आणि माहिती )

कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सात नवीन मार्ग

देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकारने सात महत्त्वाच्या हाय-स्पीड कॉरिडॉरची निवड केली आहे. यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी या मार्गांचा समावेश आहे. या कॉरिडॉरमुळे केवळ महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जवळ येणार नाहीत, तर दक्षिण भारताशी असलेला संपर्कही अधिक वेगवान होईल. उदाहरणार्थ, मुंबई ते हैदराबाद हा प्रवास साधारण 1 तास 55 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

घाटातील अडथळ्यांवर मात

सध्या मुंबई ते पुणे किंवा दक्षिण भारताकडे जाणारा रेल्वे प्रवास हा घाट विभागातील तांत्रिक मर्यादांमुळे वेळखाऊ ठरतो. लोणावळा-खंडाळा घाटातील चढ-उतार आणि वळणांमुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येतात. मात्र, प्रस्तावित हाय-स्पीड कॉरिडॉर या नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे नवीन कॉरिडॉर केवळ प्रवाशांसाठी सोयीचे नसून ते पर्यावरणास पूरक अशी वाहतूक व्यवस्था निर्माण करतील.

आर्थिक विकासाला मिळणार चालना

या हाय-स्पीड कॉरिडॉरना अर्थमंत्र्यांनी ग्रोथ कनेक्टर्स असे संबोधले आहे. वेगवान रेल्वे प्रवासामुळे व्यापार आणि उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या औद्योगिक आणि आयटी हबमधील अंतर कमी झाल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि मालाची ने-आण करणेही सुलभ होईल. पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारा हा प्रकल्प भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरू शकतो.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com