
MHADA News: अंधेरीकरांसाठी एक मोठी बातमी! मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. मंत्रिमंडळाने या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी दिली असून, यामुळे सुमारे 4,973 कुटुंबांना प्रशस्त आणि आधुनिक घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे योजना?
हा पुनर्विकास वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर पुनर्विकास प्रकल्पांच्या धर्तीवर केला जाईल. त्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकारी समितीही स्थापन केली जाणार आहे, जेणेकरून प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल.
या वसाहतीचे भूखंड जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत 1993 मध्ये वाटप झाले होते. या ठिकाणी 98 सहकारी गृहनिर्माण संस्था, उच्च उत्पन्न गटांसाठी असलेल्या अपार्टमेंट्स अंतर्गत 24 भूखंड आणि वैयक्तिक भूखंडांमध्ये 60 चौरस मीटरचे 62 भूखंड आणि 100 चौरस मीटरचे 245 भूखंड समाविष्ट आहेत.
( नक्की वाचा : MHADA News : सर्वात मोठी पुनर्विकास योजना; गोरेगावच्या रहिवाशांना ‘जॅकपॉट' लागला; 1600 चौरस फूट घर मिळणार )
काय होणार फायदा?
या सामूहिक पुनर्विकासामुळे रहिवाशांना अनेक आधुनिक सुविधा मिळणार आहेत. त्यांना प्रशस्त आणि आधुनिक घरे मिळतील, तर टाऊनशिपच्या धर्तीवर या भागात अधिक हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा आणि व्यावसायिक जागांचे नियोजन केले जाईल. खेळाची मैदाने, करमणुकीची मैदाने, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सभागृह आणि संस्था कार्यालयांचा यात समावेश असेल.
पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधाही आधुनिक स्वरूपात उपलब्ध केल्या जातील. याव्यतिरिक्त, सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापनासारख्या सुविधांचा विचार करून 'ग्रीन बिल्डिंग' डिझाइनवर भर दिला जाईल.