![Sanjay Raut : संजय राऊत काँग्रेसच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ Sanjay Raut : संजय राऊत काँग्रेसच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ](https://c.ndtvimg.com/2024-11/3uviq7lg_sanjay-raut_640x480_09_November_24.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
संजय तिवारी, नागपूर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत नसल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावरून मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी म्हटलं की, संजय राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे. संजय राऊत स्वतः एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. संजय राऊत हे किती काळ उबाठामध्ये राहतात याचे दिवस मोजा, असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंमुळे उबाठामध्ये खदखद
ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबद्दल नाराजी आहे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात जी खदखद आहे त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावे, असा सल्ला देखील नितशे राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
दुसऱ्याच्या घरात काय होतं यापेक्षा मातोश्रीला मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत. किती उपवास ठेवले जातात, यावर सुद्धा संजय राऊत यांनी लेख लिहावे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने किती बुवांकडे ते गेले याची माहिती महाराष्ट्राला द्यावी, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
सामना काँग्रेसचं मुखपत्र झालंय
संजय राऊतांना आता कुणी गांभीर्याने घेत नाही. सामना सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो. सामना वृत्तपत्र शिवसैनिक सुद्धा वाचत नाहीत. सामना आता काँग्रेसचं मुखपत्र जास्त झालं आहे. सामनाची दखल घेण्याची गरज नाही, असंही नितेश राणे म्हणाले.
खुर्चीवर नाही तर स्टूलवर बसवा
नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना मिळेल तिथे भेटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे. प्रतिसाद भेटत नसला तरी प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहे. खुर्चीवर नाही तर स्टूलवर बसवा अशा पद्धतीच्या विनवण्या केल्या जात आहे. मात्र कुणी भीक घालत नाही, अशा घणाघात नितेश राणेंनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world