Mira Road Tension: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मिरारोडमध्ये असणाऱ्या पूनम सोसायटीत गेल्या 24 तासांपासून मोठा गोंधळ सुरू आहे. कुर्बानीच्या बकरांसाठी उभारण्यात आलेला शेड आणि त्यानंतर तिथे आणण्यात आलेले डुक्कर यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी कुर्बानीच्या बकरांसाठी एक शेड उभारला होता. सोसायटीतील इतर रहिवाशांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या तक्रारीची दखल घेत मीरा-भयंदर महानगरपालिकेच्या पथकाने सोमवारी दुपारी हा शेड पाडून टाकला.
मात्र, पालिकेच्या कारवाईनंतर रात्री पुन्हा तिथे शेड उभारण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. यावरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या धुमश्चक्रीत एका तरुणावर ब्लेडने हल्ला झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : वांद्र्यात अवैध वस्ती वाचवण्यासाठी पोलिसांवर थेट हल्ला, जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आक्रमक, नेमकं काय घडतंय? )
सोसायटीत डुक्कर आणल्याने तणावात भर
हा वाद मंगळवारी दुपारी आणखी चिघळला. हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या परिसरात चक्क डुक्कर आणल्याने परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. सध्या या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
किरीट सोमय्यांचा नवा पाकिस्तानचा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेनंतर तातडीने मिरारोडला भेट दिली. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर ताशेरे ओढले. नया नगरमध्ये नवा पाकिस्तान करण्याचा प्रकार काँग्रेस करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. जोपर्यंत सोसायटीतून सर्व बकरे हटवले जात नाहीत, तोपर्यंत इथून हलणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोणत्याही सोसायटीत उघड्यावर बकरा कापू देणार नाही आणि अशा प्रकारे हिंदूंना डिवचण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही सोमय्या यांनी ठणकावून सांगितले.
भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : नसीम खान
दुसरीकडे, काँग्रेस नेते नसीम खान यांनी या वादामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप धार्मिक तणाव निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू समाजाच्या नावाखाली भाजपच्या सहयोगी संघटनांचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक वातावरण खराब करत असल्याचे नसीम खान यांनी नमूद केले.
महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत अर्धे बोकड सोसायटीतून बाहेर हलवले असून उर्वरित प्राणी काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असले तरी राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे मिरारोडमधील वातावरण तणावग्रस्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world