संपूर्ण देशाची अपेक्षा पूर्ण करा, 'रतन टाटांना भारतरत्न द्या', राज ठाकरेंचं PM मोदींना पत्र

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर) मुंबईत निधन झालं. सचोटी, देशभक्ती, नैतिकता आणि साधेपणा यासाठी रतन टाटा ओळखले जात असतं. त्यांच्या निधानानं घरातील वडिलधारी व्यक्ती हरपल्याची भावना संपूर्ण देशाची झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींसह सामान्य नागरिकांनीही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईत त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.

संपूर्ण देशाचा अभिमान असलेल्या रतन टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान अद्याप मिळालेला नाही. त्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कर देण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. राज्य सरकारनंही त्याबाबतचा ठराव पास करुन केंद्र सरकारला विनंती केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली आहे. राज यांनी हे सविस्तर पत्र X वर (पूर्वीचे नाव ट्विटर) पोस्ट केलं आहे.

( नक्की वाचा : Ratan Tata : JLR ची सवारी ते एअर इंडियाची घरवापसी, रतन टाटांच्या नेतृत्त्वातील 5 महत्त्वाचे निर्णय )

राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

प्रति, 
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, 

सस्नेह जय महाराष्ट्र, 

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही ! 

काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ? 

त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. 

तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. 

आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे. 

राज ठाकरे । 
 

Topics mentioned in this article