World Menstrual Hygiene Day 2026 : 'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे' (जगातिक मासिक पाळी स्वच्छता दिन) निमित्त धारावीत आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत 2000 हून अधिक स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदवला. 'नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडक (एनएमडीपीएल) यांच्या वतीने धारावी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती शिबिरात मासिक पाळीतील स्वच्छता, महिला आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा विषयांबाबत जनजागृती करून स्थानिक महिला आणि किशोरवयीन मुलींसोबत मुक्त संवाद साधण्यात आला.
या शिबिरामध्ये, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) आणि टाटा मेमोरियल रुग्णालयातील समुपदेशक आणि कर्करोगतज्ज्ञांच्या वतीने विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी विषयीचे गैरसमज, कर्करोगासह विविध आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य वेळेत केलेल्या उपचारांचे महत्त्व अशा विविध विषयांबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या 'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे'पासून धारावीमध्ये, एनएमडीपीएलच्यावतीने 'स्वास्थ्य साथी' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. वर्षभरात हळदीकुंकू आणि इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करणाऱ्या विविध शिबिरांचे आयोजन धारावीत करण्यात आले. महिला आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या या शिबिरांच्या माध्यमातून आजवर सुमारे 10000 महिला आणि किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करण्यात आले.
नक्की वाचा >> Akola News: 'या' पतसंस्थेत 16 कोटी 79 लाखांचा गबन, अध्यक्ष आणि CEO अटकेत, 182 गुंतवणूकदार अडचणीत
उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिन पॅडचे मोफत वितरण
या शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या महिला आणि मुलींनी, तज्ज्ञ मार्गदर्शकांसोबत मोकळेपणे संवाद साधत त्यांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन करून घेतले. शिबिराच्या सुरक्षित वातावरणात अनेक शिबिरार्थिनी निःसंकोच संवाद साधला. तसेच, आवश्यकतेनुसार वैयक्तिक समुपदेशनही करण्यात आले. शिबिरामध्ये केवळ जनजागृती न करता उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिन पॅडचे मोफत वितरण करण्यात आले.
"आपण केवळ स्वच्छतेबद्दल माहिती ऐकतो. मात्र. धारावीसारख्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रत्यक्ष अवलंब करणे जिकिरीचे आहे. अशा प्रकाराच्या शिबिरांमुळे इथल्या महिला आणि मुलींना स्वतःची काळजी घेण्याचे धडे मिळतात" अशी प्रतिक्रिया धारावीतील रहिवासी सलमा शेख यांनी दिली. रेखा यादव यांनी अशा प्रकाराच्या शिबिरातील महत्त्वाची बाब नमूद केली. "सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही संकोच न बाळगता आम्ही या शिबिरांमध्ये बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो" अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
"धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लोकांना चांगल्या सवयी अंगीकृत करण्यासाठी वारंवार कम्युनिटी इंगजमेंट आवश्यक आहे. इथल्या महिलांना योग्य तज्ज्ञांकडून, सुरक्षित वातावरणात उचित माहिती मिळाल्यास त्यांना चांगल्या आरोग्यदायी सवयी अंगवळणी पडतात. अशा शिबिरांधून इथल्या महिलांच्या आरोग्याविषयी माहिती मिळते" अशी प्रतिक्रिया एफपीएआयच्या मुंबई शाखेच्या प्रतिनिधी निशा शेट्टी यांनी दिली. "मासिक पाळीतील स्वच्छता, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या संदर्भातील जनजागृती उपक्रम महिलांना आणि किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी सुजाण निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवतात" अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडली.
नक्की वाचा >> Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
जनजागृतीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ
“‘धारावी स्वास्थ्य साथी' उपक्रमाद्वारे आम्ही आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचे काम करत आहोत. महिलांना योग्य मार्गदर्शन, जागरूकता आणि आवश्यक आरोग्य संसाधने उपलब्ध व्हावीत,संकोच कमी व्हावा आणि त्यांचा अशा शिबिरामध्ये सहभाग वाढावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत " अशी प्रतिक्रिया एनएमडीपीएलच्या प्रवक्त्याने दिली.गेल्या वर्षभरात ‘धारावी स्वास्थ्य साथी' हा उपक्रम महिलांच्या आरोग्य आणि सन्मानासंदर्भातील संवाद आणि जनजागृतीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. आरोग्यविषयक संवाद अधिक सुलभ, माहितीपूर्ण आणि समुदाय-केंद्रित करण्यावर या उपक्रमाचा भर कायम आहे.
नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएनडीपीएल) ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाची (धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट - डीआरपी) अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक विशेष उद्देश कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल - एस.पी. व्ही) आहे. या एसपीव्ही मध्ये महाराष्ट्र शासन आणि समूह हे भागधारक आहेत. धारावीकरांच्या जीवनमानात सुधारणा करणे, पायाभूत सुविधा बळकट करणे आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता उंचावणे या उद्देशाने एनएमडीपीएलची स्थापना करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.
एनएमडीपीएलच्या माध्यमातून दर्जेदार गृहनिर्माणासोबतच वाहतूक जोडणी, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता व्यवस्था तसेच डिजिटल सेवा यांसारख्या अत्यावश्यक नागरी सुविधा एकत्रित करून आधुनिक, सुरक्षित आणि समावेशक नागरी वसाहती विकसित करण्यात येणार आहेत. या पुनर्विकास प्रक्रियेत भौतिक पायाभूत सुविधांइतकेच समुदायाचे सर्वांगीण कल्याण, स्थानिक उद्योजकता आणि उपजीविका टिकविणे यांनाही समान महत्त्व देण्यात आले आहे. एमएमडीपीएलची पुनर्विकास संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या निर्धारित नियमांनुसार तसेच जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असून, शाश्वत, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशा नागरी पर्यावरणाची निर्मिती करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.