योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोला शहरातील गजानन नागरी पतसंस्थेतील तब्बल 16 कोटी 79 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी नंदकिशोर नारायण अवारे याला अटक करण्यात आली असून दुसरे आरोपी नारायण काशिराम अवारे यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ठेवीदारांमध्ये भीती आणि संताप
फिर्यादी स्मिता प्रल्हाद जाधव, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डाबकी रोड येथील गजानन नागरी पतसंस्थेने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठेवीदारांना पैसे परत करण्यात आले नाहीत. यानंतर संस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाविरोधात डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३(५) तसेच एमपीआयडी कायदा १९९९ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात विश्वासघात आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नक्की वाचा >> Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुख्य आरोपीला पोलीस कोठडी
या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदकिशोर नारायण अवारे, वय ५७ वर्षे, व्यवसाय व्यवस्थापक, रा. गजानन नगर, डाबकी रोड अकोला याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने आरोपीस ३ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरे आरोपी नारायण काशिराम अवारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानंतर त्यांची पुढील चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी २०२२ पासून सुरू होती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला.
नक्की वाचा >> Kalyan News: कसारा रेल्वे स्थानकात मोठा अनर्थ टळला, 'या' एक्स्प्रेसमधून अचानक निघाला धूर, व्हिडीओ व्हायरल
१८२ गुंतवणूकदारांच्या तक्रारी
आतापर्यंत या प्रकरणात १८२ गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या असून फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठेवीदारांची आयुष्यभराची बचत अडकल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमळे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world