आधी गजा मारणेची भेट, नंतर प्रतिक्रिया थेट; निलेश लंकेंची अजब सारवासारव

Nilesh Lanke News : गजा मारणे याच्या भेटीवरून राजकारण तापलं असताना आता निलेश लंके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सचिन अगरवाल, अहमदनगर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी नुकतीच कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. गजा मारणेने लंके यांचा यावेळी सत्कारही केला. मात्र या भेटीवरून आता निलेश लंके आणि शरद पवार गटावर विरोधकांना सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गजा मारणे याच्या भेटीवरून राजकारण तापलं असताना आता निलेश लंके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंके यांनी भेटीबाबत म्हटलं की, दिल्लीहून येत असताना पुण्यामध्ये काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो होतो. वाटेत माझी गाडी पाहून या (गजा मारणे) व्यक्तीने हात केला. साहेब मी इथेच राहतो चहा घेण्यासाठी चला, असं या व्यक्तीने मला म्हटलं. 

मला विनंती केली म्हणून मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी घरी गेल्यावर माझा सत्कार केला.  परंतु ते गृहस्थ कोण आहेत, याची मला कल्पना नव्हती. मला आज सकाळी कळाले ती व्यक्ती अशा पार्श्वभूमीची आहे.  त्याची पार्श्वभूमी मला माहित नसल्यामुळे मी त्याच्या घरी गेलो. अशा व्यक्तीच्या घरी  जाणे चूकच असल्याचं, स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिलं आहे. 

(ट्रेंडिंग बातमी - महायुतीत राष्ट्रवादी नाराज? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला नेत्यांची दांडी)

पार्थ पवारांनीही घेतली होती भेट

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. टीका करण्यामध्ये शरद पवार गट आघाडीवर होता. मात्र आता आपल्याच पक्षाचा खासदार गजा मारणेला भेटला, त्यामुळे शरद पवार गटाची कोंडी झाली आहे. 

Advertisement

(ट्रेंडिंग बातमीपंकजा मुंडे यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन बीड जिल्ह्यात तणाव, 4 गावांमध्ये बंद)

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवून गजा मारणेला पोलीस आयुक्तांकडून समज देण्यात आली होती. शिवाय पुण्यातल्या कुख्यात गुंडांची परेडही घेण्यात आली. त्यात गजा मारणेही होता. काही दिवसांपूर्वीच गजा मारणेच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गजा मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गुन्हे दाखल आहेत. 

Topics mentioned in this article