मुंबई मराठी आणि अमराठी वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. अमराठी नागरिकांकडून मराठी माणसांना घरे नाकारण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचा प्रकार देखील समोर आला आहे. याबाबत संबंधित कपंनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आर्या गोल्ड नावाची ही कंपनी आहे. अंधेरीतील मरोळ येथे ही कंपनी आहे. डायमंड फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी जागा रिक्त आहे. या जागेसाठी Indeen Job वेबसाईटवर कंपनीने जाहिरात दिली. कंपनीकडून 25-60 हजार पगार देखील दिला जाणार आहे. मात्र अटींमध्ये नॉन महाराष्ट्रीयन असं लिहिलं होते. त्यामुळे मराठी माणसांना नाकारण्याचा या कंपनीचा नेमका हेतू काय? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
कंपनीला मनसेचा दणका
आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात जाहीर झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या कंपनीवर मनसे कार्यकर्ते धडकल्यानंतर कंपनीच्या मालकाकडून राज ठाकरे यांच्या नावे माफीनामा दिला आहे. आमच्याकडून चूक झाली महाराष्ट्राची माफी मागतो. जाहिरात देखील पोर्टलवरून हटवण्यात आली आहे.
Arya Gold Company
कंपनीवर सक्त कारवाई करा- विजय वडेट्टीवार
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, वीज इथली वापरायची, पाणी इथले, सगळी व्यवस्था करून घ्यायची संरक्षण मुंबई पोलिसांनी करावं आणि रोजगार बाहेरच्या लोकांना द्यायचे. मग हा उद्योग इथे चालून उपयोग काय आहे. मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहणार आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा विचार होणार नसेल तर हा गुन्हा आहे. शासनाचे धोरण आहे, कर्नाटकच्या धर्तीवर कायदा करावा. सरकारची अनास्था यातून दिसून आली आहे. कायदा असेल आणि नियम नसेल तर दखल सरकारने घ्यावी. या कंपनीवर सक्त कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.