जाहिरात

मुंबईतून घुमणार जागतिक हवामान रक्षणाचा आवाज; बिल गेट्स, सचिन तेंडुलकरसह दिग्गज येणार एकाच व्यासपीठावर

Mumbai Climate Week 2026:  हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज झाली असून देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आले आहे.

मुंबईतून घुमणार जागतिक हवामान रक्षणाचा आवाज; बिल गेट्स, सचिन तेंडुलकरसह दिग्गज येणार एकाच व्यासपीठावर
मुंबई:

Mumbai Climate Week 2026:  हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज झाली असून देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आले आहे. ग्लोबल साऊथमधील देशांसाठी हे एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरणार असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते, उद्योगपती आणि तज्ज्ञ एकाच छताखाली येणार आहेत. हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती कशी करता येईल, यासाठी मुंबईला एक लाईव्ह टेस्ट बेड म्हणून जगासमोर सादर करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे.

काय आहे कार्यक्रम?

या ऐतिहासिक उपक्रमाचे मुख्य केंद्र वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. प्रकल्प मुंबई या पुरस्कारप्राप्त संस्थेच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असून त्याला महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेचे खंबीर सहकार्य लाभले आहे. केवळ एका हॉलपुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक केंद्रांमध्येही यादरम्यान विविध पूरक उपक्रम राबवले जाणार आहेत.

( नक्की वाचा : NEET-PG Cut-Offs:उणे 12 गुण असूनही मेडिकलला सीट! केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे गुणवत्तेचे वाजले बारा )

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, मुंबई क्लायमेट वीकच्या माध्यमातून हवामान बदलावर कृती करण्याचा भारताचा ठाम निर्धार आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. महाराष्ट्र राज्य अधिक स्वच्छ, हरित आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्वच क्षेत्रातील घटकांसोबत काम करण्यास पूर्णपणे तयार असल्याचा संदेश या परिषदेतून दिला जाईल. हा उपक्रम मुंबईच्या आणि पर्यायाने देशाच्या पर्यावरण धोरणाला नवी दिशा देणारा ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

जगभरातील दिग्गजांची हजेरी

या परिषदेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात सहभागी होणारे जागतिक स्तरावरील मान्यवर. बिल गेट्स, हिलरी क्लिंटन, राजीव शाह आणि अमांडा लेलँड यांसारखे आंतरराष्ट्रीय नेते मुंबईत येणार आहेत. भारताकडून केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, पियुष गोयल, भूपेंद्र यादव आणि प्रल्हाद जोशी यांची उपस्थिती असणार आहे. उद्योग विश्वातून नोएल टाटा, नादिर गोदरेज, जामशेद गोदरेज, अमित चंद्रा आणि व्ही. वैद्यनाथन सहभागी होतील. तसेच क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर या देखील पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अंतराळवीर साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई क्लायमेट वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. अंतराळातून पृथ्वी कशी दिसते, तिथून हवामान बदलाचे परिणाम कसे जाणवतात आणि विज्ञानाच्या मदतीने आपण आपली जबाबदारी कशी पार पाडू शकतो, यावर ते मार्गदर्शन करतील. हा संवाद तरुण पिढीला पर्यावरणाप्रति जागरूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

तीन महत्त्वाच्या विषयांवर होणार मंथन

या संपूर्ण परिषदेत अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता या तीन मुख्य विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या हवामानात शहरांना सुरक्षित कसे ठेवायचे आणि ऊर्जेचे नवे स्रोत कसे शोधायचे, यावर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने सविस्तर चर्चा होईल. पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज अंतर्गत निसर्ग संवर्धन आणि मानवी जीवन या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

युवक आणि स्टार्टअप्सना मोठी संधी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वतीने या काळात एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज आयोजित केले जाणार आहे. यात स्टार्टअप्स आणि शिक्षण संस्थांना त्यांचे नवनवीन प्रयोग मांडता येतील. तसेच युनिसेफच्या युवाह उपक्रमाद्वारे 16 ते 24 वयोगटातील तरुणांना या चळवळीत थेट सहभागी करून घेतले जाईल. प्रदर्शनामध्ये गोदरेज, महिंद्रा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांसारख्या मोठ्या कंपन्या पर्यावरणापूरक उपाययोजनांचे सादरीकरण करणार आहेत.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com