Mumbai News: मुंबईतील कोस्टल रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आज एक थरारक आणि भीतीदायक अनुभव समोर आला आहे. कोस्टल रोडवरील बोगद्यातून जात असताना एका धावत्या गाडीला अचानक भीषण आग लागली. गाडीने क्षणार्धात पेट घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि बोगद्याच्या आत मोठ्या प्रमाणावर काळा धूर पसरला. या घटनेमुळे रस्त्यावरील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
गाड्या सोडून नागरिक धावले; बोगद्यात भीतीचे वातावरण
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीला आग लागल्याचे पाहताच आणि बोगद्यात धूर साचू लागल्याने गुदमरण्याच्या भीतीने चालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने सुरक्षेचा उपाय म्हणून आपापल्या गाड्या रस्त्यावरच सोडल्या. जीव वाचवण्यासाठी नागरिक गाडीतून उतरून पळत सुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. बोगद्यासारख्या बंदिस्त जागेत आग लागल्यामुळे प्रवाशांमधील भीती अधिकच वाढली होती.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...)
गाड्या रिव्हर्स घेणेही अशक्य
ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे कोस्टल रोडवर वाहनांची लांब रांग लागली. आग लागलेल्या गाडीच्या मागे असलेल्या इतर वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून आपली वाहने पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठीमागून येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे आणि रस्त्यावर मोठी कोंडी झाल्याने गाड्या रिव्हर्स घेणेही चालकांना अशक्य झाले. यामुळे अनेक नागरिक आपल्या वाहनांसह बोगद्यातच अडकून पडले होते. अनेकजण गाडी सोडून तेथून पळाले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. बोगद्यातील अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा आणि धूर बाहेर काढणारे एक्झॉस्ट फॅन्स कार्यान्वित करण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत