योगेश पाटील,प्रतिनिधी
Mumbai Local Terror Plot Foiled: मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती की काय, असा थरकाप उडवणारा प्रश्न दिल्ली पोलिसांच्या कारवाईतून उभा टाकला आहे. मुंबईसह देशातील प्रमुख शहरांना हादरवून टाकण्याचा एक भीषण कट रचला गेला होता, जो पोलिसांनी वेळीच उधळून लावला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले 9 जण केवळ दहशतवादीच नाहीत, तर त्यांचे धागेदोरे थेट पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) आणि मुंबई अंडरवर्ल्डशी जोडले गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
आयएसआय आणि अंडरवर्ल्डचे 'खतरनाक' कनेक्शन
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेले हे 9 आरोपी पाकिस्तानमधील बसलेल्या हँडलर्सच्या सतत संपर्कात होते. या कटाचे सर्वात भयावह वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दहशतवाद्यांना अंडरवर्ल्डची साथ मिळत होती.
लॉजिस्टिक्स, पैसा आणि हालचालींसाठी अंडरवर्ल्डच्या नेटवर्कचा वापर झाला असल्याचा संशय आहे. कुर्ला, मुंब्रा आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये हे दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलिसांनी या भागांतही तपास चक्रं वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे.
( नक्की वाचा : 'झिंगाडा परतला!' 9 जणांच्या अटकेनंतर समोर आलं अंडरवर्ल्डचं सर्वात खतरनाक नाव; मुंबईवर पुन्हा सावट? )
संवेदनशील ठिकाणांची रेकी आणि मोठा कट
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी देशातील अत्यंत संवेदनशील ठिकाणांची रेकी पूर्ण केली होती. त्यांच्या हिटलिस्टवर मुंबईची लाइफलाईन असलेली मुंबई लोकल, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले करून दहशत माजवण्याचा आणि मोठी जीवितहानी करण्याचा त्यांचा इरादा होता. पोलिसांनी या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि स्फोटके जप्त केली आहेत.

सीमापारून मिळत होते निर्देश
अटक करण्यात आलेले हे संशयित दहशतवादी स्वतंत्रपणे काम करत नव्हते, तर त्यांना पाकिस्तानमधून थेट सूचना मिळत होत्या. कधी आणि कुठे हल्ला करायचा, याचे टार्गेट्स आणि वेळा सीमापार बसलेल्या मास्टरमाईंडकडून ठरवल्या जात होत्या. पाकिस्तानची आयएसआय आता भारतीय तरुणांना आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून भारताच्या सुरक्षिततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : मुंबई-दिल्लीत 26/11 ची पुनरावृत्ती टळली! दाऊदच्या मदतीने ISI ने रचलेलं मृत्यूचं जाळं पोलिसांनी उधळलं )
मुंबईसह देशातील मोठ्या शहरांत हाय अलर्ट
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, विमानतळ आणि गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः मुंबईतील कुर्ला आणि मुंब्रा सारख्या संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर आहे. हा कट उधळला गेला असला तरी, अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाची ही नवीन युती देशाला मोठा इशारा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world