Mumbai Local Update : मुंबईकरांच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन असलेल्या पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना शनिवारी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने मोठा ब्लॉक घेतला आहे. या कामाचा परिणाम थेट लोकल सेवेवर होणार असून तब्बल 300 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात
वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम सध्या जोरात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत कांदिवली आणि बोरिवली स्थानकांच्या दरम्यान पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेने 20 डिसेंबरपासून पुढील 30 दिवसांचा विशेष वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक 18 जानेवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. याच कामाचा एक भाग म्हणून 27 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
(नक्की वाचा : Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्यास होईल धावपळ )
रात्रीपासूनच कामाला सुरुवात
या ब्लॉकचे नियोजन करताना रेल्वेने 26 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेपासूनच कामाला सुरुवात करण्याचे ठरवले आहे. 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर कामाचा प्रभाव दिसेल. तसेच 26 डिसेंबरच्या रात्री 11 पासून ते 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील गाड्या संथ गतीने धावतील आणि प्रवासाचा वेळ वाढू शकतो.
लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल
पश्चिम रेल्वेवर दररोज साधारणपणे 1,406 लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मात्र 27 डिसेंबर रोजी यापैकी सुमारे 20 टक्के म्हणजेच 300 फेऱ्या रद्द राहतील. यामध्ये अप, डाऊन तसेच जलद आणि धीम्या अशा सर्व प्रकारच्या सेवांचा समावेश आहे.
बोरिवलीपर्यंत जाणाऱ्या 14 लोकल फेऱ्या या ब्लॉकमुळे केवळ गोरेगावपर्यंतच चालवल्या जातील. तसेच अंधेरीहून सुटणाऱ्या काही गाड्या देखील गोरेगावमध्येच थांबवण्यात येतील. त्यामुळे बोरिवलीच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना गोरेगावमध्ये उतरून पर्यायी व्यवस्था पाहावी लागेल.
पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय
सध्या नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचे आगमन यामुळे मुंबईत पर्यटकांची मोठी गर्दी आहे. अनेक नागरिक सुट्ट्यांच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी लोकलचा वापर करतात. अशातच एकाच दिवशी 300 फेऱ्या रद्द झाल्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world