DN Nagar-Mandale Metro: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो २बी DN नगर ते मंडाले प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने MMRDA कुर्ला येथील हलाव पुलावर दोन मोठे 'यू-गर्डर' यशस्वीरित्या बसवले आहेत.
गर्डर बसवण्याचे काम पूर्ण
हलाव पुलावर हे गर्डर बसवणे तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण काम होतं. विमानतळ प्राधिकरणाच्या उंचीच्या मर्यादेमुळे मेट्रो मार्ग आणि पुलामध्ये केवळ ३.५ मीटरचे अंतर होते. अशा कमी जागेत ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने २० मीटर लांबीचे दोन 'यू-गर्डर' बसवण्यात आले. गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला गती मिळेल. त्यानंतर विद्युतीकरण, दूरसंचार प्रणाली आणि इतर तांत्रिक कामे केली जातील.
मुंबई मेट्रो २बी प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग
मुंबई मेट्रो २बी मार्ग डीएन नगर, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर आणि मंडाले यांसारख्या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. यामुळे कुर्ला-चेंबूर परिसरातील लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुसह्य होणार आहे. हे काम शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास पूर्ण झाले. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम रात्रीच्या वेळी करण्यात आले. यादरम्यान अवजड वाहने दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली होती, तर हलक्या वाहनांना पुलाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता मुंबई मेट्रो २बी प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग आला असून, लवकरच या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.