
Mumbai Metro 3 News : बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो 3 (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी (9 ऑक्टोबर) पार पडल्यानंतर, ही मेट्रो आजपासून (गुरुवार 10 ऑक्टोबर) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली. ही संपूर्ण भूमिगत (Underground) मार्गीका 'अत्याधुनिक' सुविधांनी युक्त असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाच्या त्रुटी समोर आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, तर दुसरीकडे अनेक प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन करून मोफत प्रवासाचा आणि फोटोशूटचा आनंद घेतला.
1. नेटवर्कचा मोठा अडथळा
मेट्रो 3 ही पूर्णपणे भूमिगत असल्याने, नव्याने सुरू झालेल्या स्थानकांवर मोबाईल नेटवर्क (Mobile Network) मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास झाला.
तिकीट काढण्यात समस्या: स्थानकांवर नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन (Online) किंवा मशीनवरून तिकीट काढण्यासाठी UPI पेमेंट करण्यात प्रवाशांना अडचण आली.

एटीएमची अनुपलब्धता: या मार्गीकेवरील एकाही स्थानकावर ATM सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल पेमेंट करता येत नाही, आणि ATM नसल्यामुळे रोख रक्कम (Cash) काढता येत नाही.
सुट्ट्या पैशांचा प्रश्न: अनेक प्रवाशांना रोख रक्कम देऊन तिकीट काढायचे झाल्यास, कॅशियरकडे सुट्ट्या पैशांचा (Change) मोठा प्रश्न होता. यामुळे अनेकांना मेट्रो स्थानकावरून बाहेर पडून ATM मधून पैसे काढावे लागले, सुट्टे करून पुन्हा मेट्रोने प्रवास करावा लागला.

2. दुभाजकाच्या अभावामुळे 'फुकट प्रवास'
या मेट्रो मार्गीकेवर दक्षिणेकडे आणि पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांमध्ये दुभाजक (Divider) नसल्याची मोठी त्रुटी समोर आली आहे.
तिकीट घेऊन मेट्रोमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेकांनी एका दिशेकडील मेट्रोतून उतरून, दुसऱ्या दिशेकडील मेट्रोने प्रवास केला. यामुळे एकदा तिकीट काढून मनमुरादपणे वाटेल तेवढ्या वेळा 'Joyride' (ये-जा) करण्याचा आनंद प्रवाशांनी लुटला. यामुळे मेट्रो प्रशासनाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )
3. 'सुरक्षा नियमांचे उल्लंघन' आणि फोटोशूटचा धडाका
या मेट्रो मार्गीकेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने छायाचित्रीकरण (Photography) करण्यास प्रतिबंध आहे. असे असतानाही, केवळ मनोरंजनासाठी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी आज मेट्रोच्या आत आणि स्थानकांवर भरपूर फोटोशूट (Photoshoot) करण्याचा आनंद घेतला. मेट्रो प्रशासनाकडून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, ज्यामुळे सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी म्हणून सुरू झालेल्या या मेट्रो सेवेत तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन या समस्या पहिल्याच दिवशी समोर आल्याने मेट्रो प्रशासनाला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world