- हवामान बदलांमुळे मान्सूनचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून कमी वेळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वाढली आहे
- मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अचानक पूरस्थितीचा धोका वाढत आहे
- वसई-विरारमधील पूरस्थितीचे प्रमुख कारण नैसर्गिक निचरा बंद करणारी मोठी बांधकामे असल्याचे तज्ज्ञांचे मत
Monsoon 2026 Updates: वाढत्या हवामान बदलांमुळे मान्सूनचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून, भविष्यात कमी वेळात अतिवृष्टी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा गंभीर इशारा हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. या बदलत्या वातावरणीय पॅटर्नमुळे मुंबई आणि उपनगरांसारख्या महानगरांच्या मान्सूनपूर्व तयारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाऊस किती पडणार यापेक्षा 'कसा' पडणार हे मोठे आव्हान
तज्ज्ञांच्या मते, या वर्षाचा मान्सून संपूर्ण देशासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा संदेश देत आहे. आता आव्हान हे उरलेले नाही की एकूण पाऊस किती मिलीमीटर पडणार? तर खरे आव्हान पाऊस 'कसा' पडणार हे आहे. बदलत्या हवामानामुळे येणारी अचानक अतिवृष्टी सर्व शहरांना संकटात टाकू शकते.
वसई-विरारमधील पूरस्थितीचे मुख्य कारण समोर?
मुंबईच्या उपनगरांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण होते. यंदा वसई, विरार आणि आसपासच्या परिसरात पूर्वी ज्या जागांवरून पाण्याचा नैसर्गिक निचरा व्हायचा, तिथे आता मोठ्या प्रमाणावर बांधकामं उभी राहिली आहेत. नैसर्गिकरित्या पाण्याचा निचरा होण्याचे पर्याय नसल्याने या भागात पूरस्थितीची तीव्रता कमालीची वाढल्याचंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
(नक्की वाचा: Mumbai Alert: मुंबईकरांनो सावधान! जुलै महिना धोक्याचा... 'या' तारखा लक्षात ठेवा; BMCकडून मोठा अलर्ट)
कमी वेळात अधिक पाऊस; पॅटर्न बदलण्याचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या मूळ स्वरूपामध्येच आता मोठा बदल झाला आहे. अरबी समुद्राचे तापमान सध्या विक्रमी पातळीवर वाढत आहे आणि दुसरीकडे वातावरणाचे बदलणारे पॅटर्न यामुळे मुसळधार पावसाची तीव्रता अधिकच वाढत आहे. अरबी समुद्र विक्रमी पातळीवर तापत असल्यामुळे उत्तर-पश्चिम भारतातील पावसाचा पॅटर्नही बदलत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय.
दरम्यान अल निनो आणि हवामान बदल (Climate Change) या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. अल निनो प्रामुख्याने मान्सूनच्या सुरुवातीवर परिणाम करतो, पण तापणारा समुद्र आणि बदलणारे वातावरणीय पॅटर्न यामुळे अल्पावधीत धुवांधार पाऊस कोसळत आहे.
जर वेळीच खबरदारी घेतली नाही आणि काँक्रिटीकरण असेच सुरू राहिले तर मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रातील शहरांना भविष्यात मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world