
Mumbai Monsoon : गेल्या 75 वर्षांमध्ये सर्वात लवकर म्हणजे 26 रोजी मुंबईत दाखल झालेला मान्सून आता माघार घ्यायलाच तयार नाही! सप्टेंबर गेला, ऑक्टोबर उजाडला, तरी यंदा मुंबईवर पावसाचं 'प्रेम' काही कमी होताना दिसत नाहीये. शहरात सरासरीपेक्षा विक्रमी पाऊस नोंदवल्यानंतर आता, ऑक्टोबरमध्येही मान्सूनच्या एक्झिटला वारंवार ब्रेक लागत आहे. सोमवारपासून ( 6 ऑक्टोबर) पावसाच्या आणखी एका जोरदार सरीचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना ‘हिवाळ्या'पूर्वीच पुन्हा एकदा छत्र्या बाहेर काढाव्या लागणार आहेत!
हवामान विभागाचा इशारा काय?
हवामान विभागाने मंगळवारसाठी (7 ऑक्टोबर) मुंबईजवळील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या भागात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहरात आठवडाभर अधूनमधून सरी आणि ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः, मुंबईतून नैऋत्य मान्सूनची माघार ऑक्टोबर 8 च्या आसपास सुरू होते, परंतु या वर्षी ही तारीख पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.
( नक्की वाचा : NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती )
मान्सून लांबण्याची कारणे काय?
हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनुसार, शहरावर सुरू असलेल्या या सततच्या पावसाळी वातावरणामागे 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' (Western Disturbance ) या हवामान प्रणालीचा प्रभाव आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स ही प्रणाली हिवाळ्यामध्ये उत्तर भारतात पाऊस आणण्यासाठी ओळखली जाते.
काय आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स?
हे डिस्टर्बन्स भूमध्य समुद्राच्या (Mediterranean) परिसरात तयार होतात आणि पूर्वेकडे अफगाणिस्तान व इराण मार्गे प्रवास करतात. प्रवासादरम्यान ते भूमध्य, काळा, कॅस्पियन आणि अरबी समुद्रातून आर्द्रता (moisture) गोळा करतात. ते भारतात पोहोचल्यावर, अनेकदा अवेळी पाऊस आणतात.
मुंबईत, या प्रणालीमुळे 'मान्सून ट्रफ' (Monsoon Trough) तयार झाला आहे. ट्रफ म्हणजे पाकिस्तानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला कमी दाबाचा एक लांब पट्टा आहे. जेव्हा हा ट्रफ दक्षिणेकडे सरकतो, तेव्हा तो मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता वाढवतो.
हवामान विभागाच्या नकाशानुसार, सध्या एक ट्रफ दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून अंतर्गत तमिळनाडू मार्गे कोमोरीन क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे, ज्यामुळे मध्य अरबी समुद्रावरील नैऋत्य मान्सूनचा प्रवाह अधिक मजबूत झाला आहे.
( नक्की वाचा : NMIA : लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती )
हवामान विभागाचं स्पष्टीकरण
'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत आयएमडी मुंबईच्या एका ज्येष्ठ वैज्ञानिकांनी सांगितले, “ मुंबईतील हवामान 6 आणि 7 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ होऊन पाऊस वाढू शकतो. पुढील काही दिवसांत वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागावर परिणाम करेल. हे डिस्टर्बन्स सध्या खाली सरकत असल्यामुळे ते आर्द्रता खेचून आणेल. या आर्द्रतेमुळे पावसाच्या सरी वाढतील, जरी त्याची तीव्रता मध्यम राहण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हे तीव्र चक्रीवादळ 5 ऑक्टोबर नंतर वायव्येकडे सरकून ऑक्टोबर 6 पर्यंत कमकुवत होण्याची शक्यता आहे.
मान्सूनची लांबण्याचं कारण काय?
मान्सून परतला हे जाहीर करण्याची हवामान विभागाची विशेष पद्धत आहे. त्यासाठी सलग पाच दिवस कोरडे हवामान, वाऱ्याच्या दिशेमध्ये बदल, हवेतील आर्द्रतेमध्ये घट आणि हवामानाच्या पॅटर्नमध्ये स्पष्ट बदल यासारख्या विशिष्ट अटी पूर्ण होणे आवश्यक आहे.
या वर्षी मुंबईतली मान्यून लांबला असे अनेकांना वाटत आहे. पण, वैज्ञानिकांनी दिलेल्या, मुंबईसाठी अशी उशिरा माघार आता सामान्य झाली आहे. वास्तविक पाहता, मुंबईत सलग सहा वर्षांपासून मान्सूनची माघार उशिरा होत आहे.
मागील वर्षांतील नोंदी:
वर्ष मान्सून माघारीची तारीख
2024 ऑक्टोबर 15
2023 ऑक्टोबर 23
2022 ऑक्टोबर 23
2021 ऑक्टोबर 14
2020 ऑक्टोबर 28
यंदा मुंबईत विक्रमी पाऊस
जूनमध्ये मान्सून सुरू झाल्यापासून मुंबईत सरासरीपेक्षा लक्षणीय जास्त पाऊस झाला आहे. सांताक्रूझ वेधशाळेने आतापर्यंत 3,100 मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला आहे, तर शहराची हंगामी सरासरी 2,319 मिमी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world