Mumbai News: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्व इलेक्ट्रिक बसेसना राज्यातील द्रुतगती महामार्गांवर 100 टक्के टोलमाफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता नाशिक-मुंबई 'ई-शिवाई' बस समृद्धी महामार्गावरून धावणार असून, प्रवाशांचा केवळ वेळच वाचणार नाही, तर त्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे.
भुजबळांचा पाठपुरावा ठरला निर्णायक
गेल्या काही महिन्यांपासून मंत्री छगन भुजबळ या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांनी 3 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. ही मागणी 'महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण - 2025' च्या अनुषंगाने करण्यात आली होती, जे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 या कालावधीसाठी लागू आहे. वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन आणि प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन रोखणे, तसेच राज्यामध्ये 'स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल' राबवणे हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
या धोरणाअंतर्गत सरकारी, निमसरकारी आणि खासगी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार एसटीच्या ई-बसेसना देखील ही टोलमाफी लागू करण्यात आली होती. मात्र, याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढले गेले नसल्याने द्रुतगती महामार्गांवर या टोलमाफीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती.
मंत्री भुजबळ यांनी शासनाकडे हे परिपत्रक तातडीने काढण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य शासनाने 22 ऑगस्ट 2025 रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले आणि नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे विशेष आभार मानले आहेत.
प्रवासाचा वेळ साडेचार तासांवरून साडेतीन तासांवर
टोलमाफीची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना जुन्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करावा लागत होता. मुंबई ते नाशिक हे अंतर जुन्या मार्गावरून पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 4.5 तास लागत होते, तसेच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत होता.
(नक्की वाचा- VIDEO : 'तुला धडा शिकवणार...', एकटा मराठी मुलगा परप्रांतीय तरुणांना भिडला, अख्खी ट्रेन देणाणून सोडली)
मात्र, आता टोलमाफी लागू झाल्याने 'ई-शिवाई' बससह अन्य ई-बसेस समृद्धी महामार्गासारख्या द्रुतगती महामार्गांवरून धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवासाचा वेळ थेट 1 तासाने घटणार असून, मुंबई ते नाशिक हे अंतर अवघ्या 3.5 तासांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
महामंडळाची वार्षिक कोट्यवधींची बचत
वेळेच्या बचतीसोबतच, प्रवाशांना समृद्धी महामार्गावरील अत्यंत आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद मिळणार आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा आर्थिक फायदा राज्य परिवहन महामंडळाला (MSRTC) होणार आहे. टोलपासून सुटका झाल्यामुळे महामंडळाची वार्षिक कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे ज्यामुळे ही रक्कम इतर प्रवासी सुविधांवर खर्च करणे शक्य होईल.
या अंमलबजावणीमुळे मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-शिर्डी, तसेच मुंबईतील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'वरून प्रवास करणाऱ्या एसटीच्या सर्व ई-बसेसना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी काळात मुंबई-छत्रपती संभाजीनगर, मुंबई-नागपूर, नाशिक-छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक-नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांवर ई-बसेस सुरू झाल्यावर, त्या बसेसना देखील या निर्णयाचा थेट फायदा होईल.