Mumbai News : २१ एप्रिल रोजीचा मुंबईतील महिला मोर्चादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मुंबईतील वाहतूक कोंडीवर काळ्या रंगाची कॅप घातलेली महिला प्रचंड संतापली होती. तिने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं होतं. आता तब्बल ११ दिवसांनी ही महिला पहिल्यांदाच समोर आली असून तिने आपलं म्हणणं मांडलं आहे.
टीना चौधरीचा मोठा खुलासा...
या व्हायरल व्हिडिओमधील महिलेचं नाव टीना चौधरी आहे. तिने त्या दिवसाचा नेमका घटनाक्रम सांगितला. यावेळी टीना म्हणाली, २१ एप्रिल रोजी दुपारी ४:०० वाजता मी आपल्या मुलीला म्युझिक क्लाससाठी सोडलं. दुपारी ४:४५ वाजता मुलीला परत आणण्यासाठी जात असताना तिला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तब्बल २५ मिनिटं ती गाडीत बसून होती. काही वेळाने लक्षात आलं की समोरील बस हलत नव्हती. महिला मोर्चासाठी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र मला मुलीला आणण्यासाठी तिच्या क्लासमध्ये जायचं होतं. आधीच उशीर झाला होता. पुढील दीड तास मी तिथे असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याकडे विनंती करत होते. तिथे अडकलेल्या दोन बसेस हलवल्या असत्या, तर अडकलेल्या लोकांना यु-टर्न घेऊन मुख्य रस्त्यावर जाता आलं असतं. मात्र, पोलिसांनी माझ्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
बाटली फेकण्यामागचं कारण ..
व्हिडिओमध्ये टीना बाटली फेकताना दिसत आहेत. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, मी ती बाटली कोणत्याही आंदोलकावर किंवा रॅलीवर फेकली नव्हती. पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी ती जमिनीवर फेकली होती. या सर्व गोंधळात केवळ मंत्री गिरीश महाजन यांनीच त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे टीना हिने नमूद केलं. ती म्हणाल्या, त्या रॅलीमध्ये गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी माझं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेनंतरच त्या दोन बसेस तिथून हटवण्यात आल्या, ज्यामुळे आम्हाला यु-टर्न घेता आला आणि आम्ही मुख्य रस्त्याला पोहोचू शकलो.
माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी चालवू नका...
टीना चौधरी यावेळी म्हणाली, माझे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यात होते. आजोबा भारतीय सैन्यात असताना दोन वेळा युद्ध लढले. अनेकांनी टीना चौधरी हिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती. मी ठीक असल्याचं तिने सांगितलं. आपलं म्हणणं मांडताना तिने एक बाब अधोरेखित केली. ती म्हणाली, कोणीही या परिस्थितीचा फायदा घेऊन माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी चालवू नका. अनेकांनी मला त्यांचा आवाज होण्याचं आवाहन केलं. मात्र तुम्हाला तुमचा आवाज असताना मी तुमचा आवाज होण्याची गरज काय असा उलटप्रश्न तिने यावेळी उपस्थित केला.