Mumbai News: सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या म्हाडा (MHADA) प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कार्यालयातील वॉटर डिस्पेंसरमध्ये पिण्याच्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे म्हाडातील कर्मचारी आणि दररोज येणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
म्हाडा ऑफिसमध्ये नेमके काय घडलं?
म्हाडाच्या मुख्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी दररोज हजारो नागरिक येत असतात. तसेच येथे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून प्रत्येक मजल्यावर वॉटर डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात असतानाच वॉटर डिस्पेंसरच्या पाण्यात जिवंत अळ्या तरंगताना दिसल्या. हा प्रकार पाहताच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि संतापाची लाट उसळली.
(नक्की वाचा: Mumbai News: मुंबईच्या सर्व शाळांमध्ये आता मनाचे श्लोक सक्तीचे? माजी महापौरांच्या प्रस्तावामुळे नवा वाद पेटला)
स्वच्छतेकडे गंभीर दुर्लक्ष
प्रत्येक मजल्यावर डिस्पेंसरची सोय असूनही त्यांच्या नियमित देखभालीचा आणि साफसफाईचा अभाव असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.हा प्रकार उघडकीस येताच म्हाडा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. वरिष्ठांनी तातडीने या घटनेची दखल घेत सर्व मजल्यांवरील वॉटर डिस्पेंसरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयातील मुख्य पाण्याच्या टाक्यांचे शुद्धीकरण (Chlorination) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(नक्की वाचा: LPG Vs PNG: मुंबईकरांनो सावधान! 3 महिन्यात LGP कनेक्शन कापणार? सायन, लोअर परळसारख्या भागातील धक्कादायक वास्तव)
पिण्याच्या पाण्यात अळ्या, पाहा व्हिडीओ
तत्काळ तपासणीची मागणी
आरोग्याचा गंभीर धोका लक्षात घेता, म्हाडा प्रशासनाने केवळ वरवरची मलमपट्टी न करता सर्व डिस्पेंसरची तातडीने तांत्रिक तपासणी करावी आणि संपूर्ण कार्यालयात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. दूषित पाण्यामुळे कोणालाही विषबाधा किंवा गंभीर आजार झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world