ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai News : आतापर्यंत आपण माणसं किंवा वस्तू हरवल्याचं ऐकलं असेल. मात्र मुंबईत तर थेट सायकल ट्रॅक हरवल्याची बातमी समोर आली आहे. २०२२ मध्ये मुंबईतील दादर परिसरात एक सायकल ट्रॅक उभारण्यात आला होता. मात्र २०२६ येईपर्यंत पाच वर्षात हा सायकल ट्रॅक हरवल्याचं समोर आलं आहे. कोटींचा खर्च करून हा सायकल ट्रॅक गेला कुठे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
कोटींचा खर्च करून सायकल ट्रॅकची उभारणी...
दादरच्या सेनापती बापट मार्ग ते परळपर्यंत “One Green Mile” हा सायकल ट्रॅक आणि रस्ते सुशोभीकरण प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्णत्वास आला. या प्रकल्पाचे उद्घाटन जानेवारी 2022 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत कोटींचा खर्च करून सेनापती बापट मार्ग ते लोअर परळ 1.8 एवढ्या किमीचा स्वतंत्र सायकल ट्रॅक, रुंद पदपथ, हरित पट्टा व झाडे, बसथांबे, स्ट्रीट फर्निचर, उड्डाणपुलाखालील “परळ बाग” सार्वजनिक जागा, वाचनालय, मुलांचे खेळ क्षेत्र, व्यायाम सुविधा अशा सर्व सोयी सुविधा उभारल्या.
सायकल ट्रॅक हरवला आहे....
मात्र आता या परिसरात बांधलेला स्वतंत्र सायकल ट्रॅक आता हरवला आहे. अर्ध्या किलोमीटर पर्यंतच्या परिसरात अनधिकृत पार्किंग होत असल्याने सायकल ट्रॅक हरवला आहे. विशेष म्हणजे महानगर पालिकेच्या अनेक वाहन इथे सायकल ट्रॅकवर पार्किंग करतात. रुंद पदपथ, हरित पट्टा व झाडे, बसथांबे, स्ट्रीट फर्निचर हे बसविण्यात आले होते. मात्र अनेक झाड मृत अवस्थेत आहेत. तर काही झाड मृत होतील अशा अवस्थेत आहेत. पालिका प्रशासन वाहतूक हटवायला असमर्थ आहे. वाहतूक विभागाने हे केलं पाहिजे असं त्यांचे म्हणणे आहे. मात्र या परिसरात झाडांची आणि स्ट्रीट फर्निचरची झालेली वाताहत याकडे पालिकेच मात्र सफशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.