Mumbai News : मुंबईच्या जल वाहतुकीत आता एक मोठा आणि आधुनिक बदल पाहायला मिळत आहे. शहरात देशातील पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल फ्लाइंट बोट ‘Candela P12' ची सुरुवात झाली आहे. ही फ्लाइंट बोट वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या अनुभवासह पूर्णपणे पर्यावरण अनुकूल आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील जलवाहतूक एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुंबईत सुरू झाली हायटेक फ्लाइंग बोट सेवा...
महाराष्ट्र सरकारने जल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे विशेष पाऊल उचललं आहे. केरळनंतर आता महाराष्ट्रदेखील या दिशेने पुढे जात आहे. ‘Candela P12' नावाची ही आधुनिक इलेक्ट्रिक बोट स्वीडन कंपनी ‘Candela' ने तयार केली आहे.
गेटवे ते अलिबाग आणि एलिफंटापर्यंतचा प्रवास झाला सोपा...
ही फ्लाइंग बोट मुंबईतील दोन प्रमुख मार्गावर चालवली जाईल. पहिला मार्ग गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागपर्यंत आणि दुसरा गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुहेपर्यंत असेल. यामुळे प्रवाशांना वेगवान, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा पर्याय उपलब्ध होईल.
हायड्रोफॉइल तंत्रज्ञान कशामुळे खास आहे?
या बोटीची सर्वात मोठी खासियत ही हायड्रोफॉइल तंत्रज्ञानात आहे. जेव्हा बोट एका विशिष्ट वेगाला पोहोचते, तेव्हा ती पाण्याच्या पृष्ठभागावरून वर उचलली जाते आणि हवेत तरंगते. यामुळे पाण्याचं घर्षण कमी होते आणि बोट अधिक वेगाने व सहजतेने अंतर कापते.
पाण्यात झटके लागणार नाही, प्रवास होईल आरामदायी...
सर्वसाधारण समुद्राच्या लाटांमुळे बोटींना झटके लागतात. मात्र या बोटीच्या डिझाइनमध्ये प्रवाशांना कोणतेही झटके खावे लागणार नाही. कारण ही बोट पाण्याच्या पृष्ठभागावरुन वर उचलून चालते. त्यामुळे प्रवाशांना झटके बसत नाही. यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित असतो.
पर्यावरणासाठीही फायदेशीर...
ही फ्लाइंग बोट पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. म्हणजेच ती कोणताही धूर किंवा प्रदूषण निर्माण करत नाही. ही एक शून्य-उत्सर्जन बोट आहे, जे पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे मुंबईची जलवाहतूक स्वच्छ आणि शाश्वत होण्यास मदत होईल. या नवीन तंत्रज्ञानामुळे मुंबईने जलवाहतुकीच्या क्षेत्रात एक नवी सुरुवात केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world