Mumbai News : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 8 महिन्यांपासून एक आई आपल्या दोन वर्षांच्या लेकीला मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई पोलीस या आईची आर्त हाक ऐकून घेण्यास तयार नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अखेर हे प्रकरण मनसेपर्यंत पोहोचलं. यानंतर आता थेट संदीप देशपांडे मालाड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
पीडित आईसोबत नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिलेने नोकरीमुळे आपली लहान मुलगी मानलेल्या मावशीकडे सांभाळण्यासाठी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेने मावशीकडे काही पैसे उधारीवर घेतले होते आणि ते परत दिले नाहीत. म्हणून या मावशीने लहान बाळाच्या आईला कोणतीही माहिती न देता तिसऱ्या महिलेकडे मुलीला पाठवलं. ही तिसरी महिला म्हणजे मावशीची नणंद. यानंतर मावशीने बाळाला आईकडे देण्यात नकार दिला. महिलेने त्यांच्या लेकीला आपल्याला विकल्याचं सांगत मावशी बाळाला देण्यास नकार देत आहे. मुलीच्या आईने मावशीकडून पैसे उधार घेतले आहे. जोपर्यंत पैसे परत देणार नाही तोपर्यंत मुलगी परत मिळणार नाही अशी भूमिका मूल सांभाळणाऱ्या मावशीने घेतली. ही घटना अमरावतीतील आहे. मात्र शेवटी मावशीच्या नणंदेकडे ही मुलगी सोपविण्यात आली आणि ती मालाड परिसरात राहते.
आईची धडपड...
ही मुलगी परत मिळवण्यासाठी आठ महिन्यापासून आई धडपड करत आहे. तीन महिन्यापूर्वी या मुलीच्या आईने मालाड पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली होती, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. या सगळ्यात धक्कादायक म्हणजे मालाड पोलीस ठाण्यात सकाळी मनसेच्या महिला कार्यकर्त्या दाखल झाल्या. तेव्हाही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. यानंतर आता थेट संदीप देशपांडे मालाड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.