शरीरात असामान्य हिरव्या रंगाचे बदल, फॅमिली डॉक्टरच्या जबाबातून पायधुनीच्या कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उकलणार?

Pydhonie Death Case: मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन अहवालात शरीरात मॉर्फिन आणि अज्ञात कण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि एफडीएच्या तपासातील सविस्तर अपडेट्स वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Pydhonie Death Case: पायधुनीच्या डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूचं कोडं सुटणार?"

Pydhonie Death Case: मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. रात्री उशीरा कलिंगड खाऊन झोपलेले हे संपूर्ण कुटुंब सकाळी मृतावस्थेत आढळले होते, ज्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत्यूचे कारण 'फुड पॉयझनिंग' (अन्नबाधा) असल्याचे सांगितले जात होते, पण अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) प्राथमिक तपासात कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये काहीही हानिकारक गोष्ट आढळलेली नाही.

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासात सुरुवातीस खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये कोणताही विषारी किंवा हानिकारक पदार्थ सापडला नाही. संबंधित कुटुंबाच्या घरातून एकूण 11 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, ज्यामध्ये बिर्याणी, कलिंगड, फ्रीजमधील पाणी, कच्चे आणि शिजवलेले तांदूळ, चिकन, खजूर आणि मसाले यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या तपासणीत भेसळीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

पोलिसांनी नोंदवला डोकाडिया कुटुंबाच्या फॅमिली डॉक्टरचा जबाब

मिळालेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल रोजी मुंबईच्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता त्या डॉक्टरची चौकशी केली आहे, ज्यांनी डोकाडिया कुटुंबाची प्रकृती बिघडल्यावर सर्वात आधी त्यांच्यावर उपचार केले होते. सध्या डॉक्टरांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस या कुटुंबाच्या रहस्यमयी मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सर्व संभाव्य पैलू आणि वैद्यकीय नोंदींची बारकाईने तपासणी करत आहेत.

Advertisement

कुटुंबाच्या मृत्यूचे कारण फुड पॉयझनिंग? उलट्या आणि जुलाबाचा त्रास 

25 एप्रिल रोजी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पायधुनी भागात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाच्या घरी काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केल्यानंतर हे कुटुंब रात्री उशीरा कलिंगड खाऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. मृत्यूचे कारण फुड पॉयझनिंग असल्याचे सांगितले जात होते, कारण सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता.

डीसीपी प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल रोजी मृत कुटुंबाने काही नातेवाईकांना जेवणासाठी घरी बोलावले होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांसोबत कुटुंबाने जेवण केले. जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले, पण रात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून कलिंगड खाल्ले होते. हेच कलिंगड त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे मानले जात होते.
(नक्की वाचा : Mumbai News: कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू! फॉरेन्सिक चाचणीत चक्रावणारा खुलासा; हिरवट अवयव.. डॉक्टरही हादरले)पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सर्व सदस्यांच्या शरीरात आढळले 'मॉर्फिन'

मृत कुटुंबाच्या शवविच्छेदन अहवालात (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट) मृतांच्या शरीरात मॉर्फिन आढळले, जे एक प्रकारचे पेन किलर औषध आहे. याव्यतिरिक्त शरीरातील काही टिश्यूंमध्ये असामान्य हिरव्या रंगाचे बदल देखील दिसून आले. साधारणपणे असा बदल एखाद्या विषारी पदार्थामुळे होऊ शकतो, पण अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की हे विष नक्की काय होते आणि ते शरीरात कसे पोहोचले?

(नक्की वाचा: Mumbai News: कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू? FDA च्या अहवालातून सर्वात मोठा खुलासा, प्रकरणात नवा ट्वीस्ट)

अवयवांच्या नमुन्यांच्या प्राथमिक तपासात आढळले काही अज्ञात बाह्य कण

कलिना फॉरेन्सिक लॅबच्या एका अधिकाऱ्याने यास दुजोरा दिला असून डोकाडिया कुटुंबातील सदस्यांच्या अवयवांच्या नमुन्यांच्या प्राथमिक तपासणीत काही अज्ञात बाह्य कण आढळले आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की,"सुरुवातीच्या अहवालात नमुन्यांमध्ये बाह्य पदार्थांच्या अस्तित्वाचे संकेत मिळाले आहेत. पण हे कण विषारी आहेत की औषधी किंवा अन्य कोणत्या प्रकारचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा सविस्तर तपास सध्या सुरू आहे."

पोलीस आता हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत की, हे केवळ फुड पॉयझनिंगचे प्रकरण आहे की यामागे दुसरे काही कारण दडलेले आहे. टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट आल्यानंतरच या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या विषाचे सेवन झाले होते की नाही? हे स्पष्ट होईल.

पती-पत्नी आणि दोन मुलींच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूने परिसरात खळबळ

संपूर्ण कुटुंबाचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून त्यांच्या अन्नाचे आणि शरीराचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत. फॅमिली डॉक्टरच्या जबाबामुळे या मृत्यूमागील गूढ उकलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

Advertisement