मेहबूब जमादार, रायगड
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर बोरघाट हद्दीत झालेल्या भीषण गॅस टँकर अपघातामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. 15 तास उलटूनही प्रोपोलिन गॅसची गळती थांबवण्यात यंत्रणांना पूर्णपणे अपयश आल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग अजूनही प्रभावित आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील बोरघाट टॅब हद्दीत मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास एक गॅस टँकर पलटी झाला. या टँकरमधून ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती समोर आली आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar VIDEO: बायोपिक आला तर हिरो कोण? खुद्द अजितदादांनीच सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव!)
वाहतुकीची सद्यस्थिती काय आहे?
रात्री उशिरा घटनास्थळी केमिकल एक्सपर्टसह NDRF ची टीम दाखल झाली. मात्र, 15 तास उलटूनही ही गळती पूर्णपणे बंद करता आलेली नाही. गॅस हवेत वेगाने पसरत असल्याने परिसरात सुरक्षा कडे तैनात करण्यात आले आहे. मुंबई-पुणे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टप्याटप्याने ब्लॉक घेतले जात आहेत आणि पुण्याकडे येणारी वाहतूक रोखून मुंबईकडे वाहतूक सोडली जात आहे.
अवजड वाहतूक बोरघाटात अडवली
मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक अद्याप बोरघाटात रोखून धरण्यात आली आहे. प्रवासी कार आणि हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोलीमार्गे वळवण्यात आली आहेत. रात्री 11 नंतर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरून काही प्रमाणात मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात यश आले असले, तरी वेग मंदावलेला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
(नक्की वाचा- Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)
प्रवाशांसाठी सूचना
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा. आडोशी बोगदा आणि बोरघाट परिसरात गॅसचा वास येत असल्यास वाहनाच्या काचा बंद ठेवाव्यात आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे. आज दिवसभर या मार्गावर ट्रॅफिक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवासाचे नियोजन आधीच करा.