Mumbai-Pune Expressway वर 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत रागा, प्रवासी हैराण!

Mumbai-Pune Expressway Traffic jam: मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून, अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका या दरम्यान तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबुब शेख, रायगड

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून, अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका या दरम्यान तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः खोपोली हद्दीत वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सरकत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळपासून वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वाहतूक कोंडीची कारणे

जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान 

उद्या (7 फेब्रुवारी) राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक खाजगी कंपन्या आणि आस्थापनांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar on ZP Election: "शब्द पाळणे ही माझी ओळख...", मतदानापूर्वी अजित पवारांची मतदारांना अखेरची साद)

विकएंडची सुट्टी 

शनिवार आणि रविवार असा सलग सुट्ट्यांचा काळ असल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने पुणे आणि महाबळेश्वरच्या दिशेने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. आडोशी बोगद्याजवळील टँकर अपघातामुळे मागील 32 तास हा मार्ग विस्कळीत होता. रस्ता पूर्णपणे मोकळा होताच, रखडलेली सर्व वाहने एकाच वेळी बाहेर पडल्याने हा ताण निर्माण झाला आहे.

लवकर घाट ओलांडण्याची घाई 

सकाळच्या वेळी घाट पार करून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी सर्वच वाहनचालकांनी एकाच वेळी प्रवास सुरू केल्याने खालापूर ते लोणावळा दरम्यान पेच निर्माण झाला आहे. सध्या एक्सप्रेस वेवर वाहने अक्षरशः रांगत आहेत. तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खालापूर टोल नाक्यावरही वाहनांचा मोठा भार असून टोल भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल)

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. अधूनमधून अवजड वाहने थांबवून लहान वाहनांना वाट मोकळी करून दिली जात आहे. मात्र, वाहनांचा ओघ पाहता ही कोंडी निस्तरण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.