जाहिरात

Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल

Railway Megablock: नव्या मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला हे काम 6 महिने चालणार होते, मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने हे नियोजन 3 महिन्यांवर आणले आहे.

Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा आगामी काळात सलग तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाला दुजोरा दिला असून लवकरच याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.

ब्लॉक घेण्याचे मुख्य कारण काय?

नव्या मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला हे काम 6 महिने चालणार होते, मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने हे नियोजन 3 महिन्यांवर आणले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 964.84 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2027 पर्यंत आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर)

प्रवाशांवर होणारा परिणाम

या ब्लॉकमुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. सध्या गोरेगाव-सीएसएमटी दरम्यान 88, तर वांद्रे-सीएसएमटी दरम्यान 106 लोकल फेऱ्या धावतात. दररोज सुमारे 3.62 लाख प्रवासी या मार्गावरून पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेकडे (हार्बर मार्गे) प्रवास करतात. ब्लॉक काळात वांद्रे-सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा रेल्वेचा विचार आहे, मात्र गोरेगाव ते वांद्रे दरम्यान सेवा पूर्णपणे खंडित असेल. लोकमतने याबाबतचं वृ्त्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रकल्प रखडण्याची कारण काय?

हा प्रकल्प रखडण्यामागे काही महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. महालक्ष्मी-लोअर परेल येथील शक्ती मिलच्या जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील 155 कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप एमएमआरडीएकडून पूर्ण झालेले नाही. 2017-18 मध्ये 10 कोटी खर्चून उभारलेली 5 वी मार्गिका स्थानिक विरोधामुळे कार्यान्वित होऊ शकली नाही. जर ती तेव्हा सुरू झाली असती, तर आज पूल पाडण्याची आणि सेवा बंद करण्याची वेळ आली नसती, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(नक्की वाचा-  Airtel ग्राहकांना झटका! प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; कोणत्या ग्राहकांना बसणार फटका)

भविष्यातील कसा होईल फायदा

रेल्वेच्या मते, हा तीन महिन्यांचा त्रास सहन केल्यास भविष्यात मोठे फायदे मिळतील. पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते बोरीवली आणि विरार दरम्यान लोकल फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावतील, ज्यामुळे लोकलच्या विलंबाचा प्रश्न सुटेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com