जाहिरात

'1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

CM Devendra Fadnavis assembly speech 2026: मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या राजकारणावर आणि बदनामीच्या मोहिमेवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हल्ला चढवला.

'1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवर टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला.
मुंबई:

CM Devendra Fadnavis assembly speech 2026: "पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देणारे भाड्याचे तट्टू फिरत आहेत. मला कितीही शिव्या द्या, मी शिव्याप्रूफ आहे. आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाहीत, पण ही कनेक्टिंग लिंक तिथेच दिसेल आणि त्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचेच नाव असेल," अशा अत्यंत जळजळीत आणि टोकदार शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आणि सोशल मीडिया ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला. 

मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या राजकारणावर आणि बदनामीच्या मोहिमेवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हल्ला चढवला. माझी बदनामी खुशाल करा, पण जर महाराष्ट्राची बदनामी कराल तर कोणालाही सोडणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.

कनेक्टिंग लिंक म्हणजे 'इंजिनिअरिंग मार्व्हल'

या प्रकल्पावर 7000 कोटी रुपये पाण्यात गेल्याची टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक वास्तव सांगत चोख उत्तर दिले. ही लिंक म्हणजे एक 'इंजिनिअरिंग मार्व्हल' असून, यामध्ये भारतातील सर्वात उंच केबल स्टेड ब्रीज आणि जगातील सर्वात रुंद बोगदा तयार करण्यात आला आहे. ताशी 170 किमी वेगाने वारे वाहणाऱ्या भागात हे आव्हान पूर्ण केले आहे. 

( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )

मुसळधार पावसामुळे केवळ वरून आलेला दरडीचा मलबा कमानीवर पडला होता, मुख्य बोगद्याला किंवा पुलाला कुठेही क्रॅक गेलेला नाही. विरोधकांनी 7000 कोटी पाण्यात गेल्याचा खोटा प्रचार केला, पण प्रशासनाने सर्वांच्या नाकावर टिच्चून अवघ्या 18 तासांत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करून दाखवला.

आधीच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती

हा प्रकल्प महायुती सरकारच्या हिंमतीमुळेच पूर्ण होऊ शकला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 2 पानांचे पत्र लिहून, 14 कारणे देत हा प्रकल्प करणे अशक्य असल्याचे सांगून फाईल बंद केली होती, असा मोठा खुलासा त्यांनी केला. या वादावर हसणाऱ्या जयंत पाटील यांना रोखत, 'जयंतराव तुम्ही हसू नका', असा टोला त्यांनी लगावला. तब्बल 1000 खोटारडे मेल्यानंतर हे आरोप करणारे जन्माला आले असतील, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

कोकण रेल्वेचा दाखला 

या परिस्थितीची तुलना मुख्यमंत्र्यांनी कोकण रेल्वेच्या इतिहासाशी केली. जेव्हा मधू दंडवते यांनी हिंमत दाखवून कोकण रेल्वे सुरू केली, तेव्हाही सुरुवातीची 15 वर्षे पावसाळ्यात तिथे दरडी कोसळत होत्या.  तेव्हा घाबरून काम थांबवले असते तर आज कोकण रेल्वे दिसली नसती. या घटनेतून आम्ही धडा घेतला असून, पाण्याचा प्रवाह आणि भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी (IIT) मधील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे. पुढील वर्षी अशी कोणतीही दुर्घटना घडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलं.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com