Mumbai-Pune Expressway traffic congestion : ३ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. येथे ३० चे ४० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या २३ तासांपासून मुंबई-पुणे महामार्गावर हिच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान गॅसचा टँकर पलटी झाला होता. या टँकरमधील प्रोपलिन गॅस लिक झाला होता. त्यानंतर पुढील बराच वेळ टँकरमधील गॅस लिक होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली होती.
महामार्ग पोलीस अधीक्षकांची मोठी माहिती...
महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी NDTV मराठीशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं पलटी झालेल्या टँकरमधून प्रोपलिन नावाच्या वायुची गळती झाली. हा वायू अत्यंत धोकादायक असल्याने सुरक्षेची अधिक काळजी घेतली जात आहे. सध्या या पलटी झालेल्या टँकरमधील गॅस रिकाम्या टँकरमधून काढून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पलटी झालेला टँकर सरळ करून त्याला हटविण्यात येईल. हा वळणाचा रस्ता असल्याने ड्रायव्हरला टँकरवर नियंत्रण करता न आल्याने हा अपघात झाल्याचं चिखले यांनी सांगितलं.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर परिणाम...
मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या आणि स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवरही त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. बरेच प्रवासी इथे बस डेपोत कोळंबे आहेत. तर अनेक गाड्या पुण्याच्या आणि स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या या बसेस जागच्या जागी उभ्या आहेत.
आणखी किती प्रतीक्षा...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी ६ ते ७ तास लागण्याची शक्यता आहे. एक्सप्रेसवे बंद असल्याने अनेक गाड्या जुन्या मुंबई-पुणे हायवेने जात आहे. मात्र अतिरिक्त वाहनांमध्ये येथेही वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे तातडीचं काम नसेल तर पुण्याच्या दिशेने रस्ते प्रवास करणं टाळा.