Mumbai Traffic: मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न, 20 दिवसांत अहवाल सादर होणार

Mumbai News: सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरांतून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (15 जुलै 2025) विधान परिषदेत दिली. आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती, त्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये एक मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यात तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल चहल यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने 20 दिवसांत गृह व परिवहन विभागाला अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.  

Advertisement

मुंबईत दररोड 794 नव्या वाहनांची नोंद

गाडी पार्किंगमध्ये असतानाही चलन मिळतात, हे गंभीर प्रकार आहेत. त्यांचीही चौकशी सुरू आहे. कोणी आणि कुठे कॅमेरे लावले, याची माहिती घेतली जात आहे, असे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे मंत्री सामंत यांनी म्हटले. आजपर्यंत महाराष्ट्रात 4 कोटी 95 लाख वाहने नोंदवण्यात आली आहेत. फक्त मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते. यामुळेच मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

मेट्रो वसई-विरारपर्यंत नेणार

राज्यात मेट्रो प्रकल्पांची प्रगती सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत 393.76 किमी, पुण्यात 136.42 किमी आणि नागपुरात 83.82 किमी लांबीचे मेट्रो प्रकल्प साकारले जात आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.5 ते 2 कोटी लोक दररोज मेट्रोने प्रवास करतील. मुंबईतील सागरी किनारा रस्ता हा ऐतिहासिक प्रकल्प असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, पूर्वी वांद्र्याहून नरिमन पॉईंटला पोहोचायला दीड ते दोन तास लागायचे, आता तोच प्रवास 17-18 मिनिटांत होतो. सामंत यांनी पुढे म्हटले की, वसई-विरारपर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प केला आहे. शहरांत रिंगरोडसुद्धा उभारले जात आहेत. सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरांतून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत. सभागृहात सदस्य  तांबे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना सामंत म्हणाले की, वाहतूक नियंत्रण करताना पोलीस, परिवहन आणि महसूल विभाग एकत्रित कारवाई करतात. यामुळेही ट्रॅफिक जाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, सर्व संबंधित मुद्दे त्या समितीत समाविष्ट केले जातील.
 

Advertisement
Topics mentioned in this article