Mumbai Water Level: मुंबई आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासांच्या कालावधीत मुंबईच्या 7 जलाशयांमधील एकूण पाणीसाठा 16.92% वर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, गेल्या 24 तासांत एकूण साठ्यात 3.73% ची मोठी वाढ झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवाठ करणाऱ्या धरणांची सद्यस्थिती
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सर्व धरणांची एकूण क्षमता 14,47,363 दशलक्ष लीटर आहे. सध्या 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत या धरणांमध्ये एकूण 2,44,900 दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा साठा जरी कमी असला, तरी 2024 च्या तुलनेत यंदा चांगली सुरुवात मानली जात आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)
कोणत्या धरणात किती पाऊस आणि किती टक्के साठा?
- तुळशी - 82.14%
- विहार - 90.61%
- भातसा- 14.12%
- तानसा - 17.34%
- मोडक सागर - 30.96%
- मध्य वैतरणा - 18.35%
- अप्पर वैतरणा - 4.99%
(नक्की वाचा- Prathmesh Parab: 'दगडू'ची गाडी रुतली चिखलात! वसईची पोरं आली धावून, मात्र प्रथमेश VIDEO मुळे होतोय ट्रोल?)
धरण क्षेत्रातील पाणी पातळीत झालेली वाढ
गेल्या २४ तासांत सर्वच धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. भातसा धरणाची पातळी 2.10 मीटरने वाढली आहे, तर मध्य वैतरणा 1.90 मीटर आणि तुळशी 1.13 मीटरने वाढली आहे. मोडक सागर आणि तानसा धरणाच्या पातळीत अनुक्रमे 0.91 मीटर आणि 0.75 मीटरची वाढ झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांत पाणीसाठ्यात मोठी भर पडेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world