मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपलं. कमी वेळेत झालेल्या जास्त पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सोमवारी पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला होता.
पावसाचा जोर कमी झाल्याने मुंबईत अनेक भागात साचलेलं पाणी ओसरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल वाहतुक सुरळीत झाली आहे. रस्त्ये वाहतुकही सुरळीत आहे. त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडतं आहेत. मात्र अनेकांनी घरी राहणेचं पसंत केल्याने रेल्वे स्थानकांवर दिसणारी गर्दी काहीशी कमी दिसली.
(नक्की वाचा- ठाण्यापाठोपाठ मुंबई, पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर)
हार्बर रेल्वेची वाहतूक सुरु
हार्बर रेल्वेवरील पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक सकाळी 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकानुसार 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत.
शाळा-कॉलेजना सुट्टी
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी दिलेल्या इशाऱ्याच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना मंगळवार (9 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट)
राज्यभरात कशी आहे स्थिती?
मुंबई, ठाणे आणि कोकणात रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भासाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही पावसाचा हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
रेड अलर्ट कुठे आहे?
मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
ऑरेंज अलर्ट कुठे?
पालघर, ठाणे, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.