जून महिन्यात 'कधी पडणार' असा प्रश्न पडायला लावलेल्या पावसाने जुलै महिन्यात मुंबईकरांना 'कधी थांबणार' असा प्रश्न पडायला भाग पाडलंय. जुलै महिन्यात पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढलं आहे. मुंबई हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रावर जुलै महिन्यात 1500 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिना संपायला अद्याप 6 दिवसांचा कालावधी असून येत्या काही दिवसांतही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास यंदाचा जुलै महिना हा सर्वाधिक पावसाचा जुलै महिना ठरेल.
हे ही वाचा - खुशखबर! मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव भरले
जुलै महिन्यात साधारणपणे 840 मिलीमीटर पावसाची नोंद केली जाते. हा टप्पा पावसाने यंदा कधीच पार केला आहे. 2009 नंतर मुंबईमध्ये पावसाने 1000 मिलीमीटरचा टप्पा 9 वेळा ओलांडला आहे. जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस हा गेल्या वर्षी झाला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 1768 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. या वर्षी 25 जुलैपर्यंत 1500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जुलै महिन्यात जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे.
हे ही वाचा - अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात साचलं पाणी, भगवान महादेवाला जलाभिषेक
25 ते 27 जुलै या तीन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 26 जुलै रोजी मुंबई ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 28 आणि 29 जुलैला पावसाचा जोर कमी होईल मात्र 30 आणि 31 जुलैला पाऊस पुन्हा जोर धरेल अशी शक्यता आहे. 3 ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहील असा अंदाज आहे. स्कायमेटवेदरने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हे ही वाचा - अंडाभूर्जीचा स्टॉल वाचवायला गेले अन्...; पुण्याच्या झेड ब्रिजखाली तिघांचा मृत्यू
धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयात जुलै महिन्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै ते 25 जुलै या कालावधीत पाणीसाठ्यात सुमारे 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईसाठी लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या पावसाळ्याच्या प्रारंभापर्यंत मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाणीसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक 30 मे 2024 पासून 5 टक्के तर दिनांक 5 जून 2024 पासून 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली होती.